"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:22 IST2026-04-30T17:18:39+5:302026-04-30T17:22:55+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संदर्भात "वादळ येतंय" अशी पोस्ट करून इशारा दिला आहे.

"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल'या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक गूढ आणि तितकीच इशारा देणारी पोस्ट शेअर केली आहे. "एक मोठे वादळ येत आहे आणि त्याला आता कोणीही रोखू शकणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, अमेरिका इराणवर मोठा लष्करी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे वादाची पार्श्वभूमी?
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाला होता. त्यावेळी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर आणि लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले केले होते. प्रत्युत्तरादाखल इराणनेही अमेरिकन तळांना लक्ष्य केले. सुमारे ३९ दिवस चाललेल्या या भीषण युद्धानंतर ८ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या मध्यस्थीने तात्पुरता सीजफायर लागू करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा शांततेचा करार धोक्यात आल्याचे दिसत आहे.
स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि अण्वस्त्रांचा पेच
इराणने सध्या जगातील महत्त्वाचा व्यापारी मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुज रोखून धरला आहे. इराणने हा मार्ग मोकळा करावा आणि युद्ध कायमचे संपवावे, असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे की, आधी इराणने आपला अणू कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा, तरच आर्थिक निर्बंध उठवले जातील आणि नाकेबंदी हटवली जाईल. इराण मात्र अणू कार्यक्रमावर तडजोड करण्यास तयार नसल्याने वाटाघाटी फिस्कटल्या आहेत.
सैन्य हालचाली आणि आगामी धोका
ट्रम्प यांच्या या 'वादळा'च्या पोस्टमुळे लष्करी तज्ज्ञ असा अंदाज लावत आहेत की, अमेरिका इराणच्या ऊर्जा केंद्रांवर किंवा महत्त्वाच्या पुलांवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे. अमेरिकन नौदलाने यापूर्वीच पर्शियन गल्फमध्ये मोठी फौज तैनात केली आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे केवळ इराणच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेतील घडामोडींकडे लागले आहे.