सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठलेला असतानाही, भारतीय ग्राहकांचा सोन्याकडे असलेला ओढा तसूभरही कमी झालेला नाही. जागतिक सुवर्ण परिषदेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२६ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढून १५१ टनांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आता सोन्याचा वापर दागिन्यांसाठी करण्यापेक्षा 'गुंतवणूक' म्हणून करण्याकडे कल वाढला आहे.
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे दागिन्यांच्या मागणीवर दबाव आला असला, तरी गुंतवणूकदारांनी मात्र सोन्याला पसंती दिली आहे. सोन्याच्या विटा, नाणी आणि ETF मधील गुंतवणूक ५४ टक्क्यांनी वाढून ८२ टनांवर पोहोचली आहे. सोन्याच्या किमतीतील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी या पर्यायांची निवड केल्याचे अहवालात म्हटले आहे.
किंमत १५१,१०८ रुपये प्रति १० ग्रॅम!
अहवालानुसार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची सरासरी किंमत यंदा ८१ टक्क्यांनी वाढून १,५१,१०८ रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही किंमत ८३,३७५ रुपये होती. किमतीतील या अफाट वाढीमुळे मूल्याच्या बाबतीत सोन्याची मागणी ९९ टक्क्यांनी वाढून २,२७,५०० कोटी रुपयांवर गेली आहे.
दागिन्यांच्या मागणीत घट
सोन्याच्या कडाडलेल्या भावाचा फटका दागिन्यांच्या बाजारपेठेला बसला आहे. पहिल्या तिमाहीत दागिन्यांची मागणी १९ टक्क्यांनी घटून ६६ टनांवर आली आहे. सर्वसाधारणपणे दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय बाजारपेठेत आता नाणी आणि विटांच्या खरेदीत झालेली ३४ टक्क्यांची वाढ हा एक मोठा बदल मानला जात आहे. २०१३ नंतर पहिल्या तिमाहीत सोन्याच्या नाण्यांची ही विक्रमी विक्री ठरली आहे.
