४५ वर्षांत पहिल्यांदाच 'ही' ट्रेन मे महिन्यात धावणार; तिकिटाचे भाडे तब्बल ₹१८ लाख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:16 IST2026-04-27T16:06:17+5:302026-04-27T16:16:34+5:30

Rajasthan Palace on Wheels: भारतातील सर्वात महागडी ट्रेन!

Rajasthan Palace on Wheels: राजस्थानची शाही ओळख बनलेली लक्झरी ट्रेन Palace on Wheels पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जवळपास ४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही ट्रेन मे महिन्यातील तीव्र उष्णतेत पर्यटकांना राजस्थानची सफर घडवणार आहे. आतापर्यंत ही ट्रेन फक्त हिवाळा किंवा अनुकूल हवामानातच चालवली जात होती.

विशेष चार्टर बुकिंग- मिळालेल्या माहितीनुसार, एका राष्ट्रीयकृत बँकेने आपल्या ८४ सदस्यांसाठी संपूर्ण ट्रेन चार्टर केली आहे. या प्रवासाची सुरुवात 20 मे रोजी दिल्लीतून होईल आणि पहिला स्टॉप 21 मे रोजी जयपूरमध्ये असेल. आंतरराष्ट्रीय परिस्थितींमुळे परदेशी पर्यटकांची संख्या घटलेली असताना, हा उपक्रम पर्यटन उद्योगासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.

उन्हाळ्यासाठी खास मेन्यू- उन्हाळ्याच्या तीव्रतेचा विचार करून ट्रेनमधील खाद्यपदार्थांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना थंडावा देणारे स्थानिक पदार्थ देण्यावर भर दिला आहे. प्रमुख पदार्थांमध्ये सवाई माधोपुरमध्ये आम पन्हा, चित्तौडगडमध्ये गुलाबाची थंड खीर, उदयपूरमध्ये ठंडाई, जैसलमेरमध्ये ऑरेंज ड्रिंक आणि जयपूरमध्ये लस्सी, कुल्फी, फालूदासारखे पदार्थ दिले जातील.

पर्यटन क्षेत्राला दिलासा- तज्ज्ञांच्या मते, ऑफ-सीजनमध्ये (मे महिना) अशा प्रकारची चार्टर सफर पर्यटन उद्योगासाठी “संजीवनी” ठरू शकते. यामुळे हॉटेल उद्योगाला चालना मिळेल, ट्रॅव्हल व्यवसायात वाढ होईल आणि स्थानिक व्यापाऱ्यांनाही आर्थिक फायदा मिळेल.

किती आहे तिकीट?- Palace on Wheels ही भारतातील सर्वात महागड्या ट्रेनपैकी एक मानली जाते. ७ रात्र आणि ८ दिवसांच्या या शाही प्रवासासाठी विविध श्रेणींनुसार दर ठरवलेले आहेत. प्रेसिडेंशियल सूट: ₹२.६७ लाख प्रति दिवस | ₹१८.७ लाख पूर्ण पॅकेज, सूट श्रेणी: ₹२.१८ लाख प्रति दिवस | ₹१५.३ लाख पूर्ण पॅकेज, सुपर डिलक्स केबिन: ₹१.९५ लाख प्रति दिवस | ₹१३.६ लाख पूर्ण पॅकेज, डिलक्स (सिंगल): ₹१.१० लाख प्रति दिवस | ₹७.७ लाख पूर्ण पॅकेज, डिलक्स (डबल): ₹७१,००० प्रति दिवस प्रति व्यक्ती | ₹५ लाख पूर्ण पॅकेज.