"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:03 IST2026-04-27T17:00:38+5:302026-04-27T17:03:14+5:30
शिंदे यांचा शिवपुरी येथील एका कार्यक्रमात दिलेला हा सल्ला सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे, हा सल्ला देताना त्यांनी, आपण आपल्या कारमध्येही एसी लावत नाही, असा दावाही केला आहे.

"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
सध्या संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट पसरली आहे. पारा जवळपास ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. हवामान विभागाने अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला आहे. यातच केंद्रीय मंत्री तथा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी कडक उन्हापासून बचावासाठी एक खास देशी उपाय सांगितला आहे. शिंदे यांचा शिवपुरी येथील एका कार्यक्रमात दिलेला हा सल्ला सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे, हा सल्ला देताना त्यांनी, आपण आपल्या कारमध्येही एसी लावत नाही, असा दावाही केला आहे.
मंत्री शिंदे शनिवारी आणि रविवारी शिवपुरी दौऱ्यावर होते. त्यांनी बदरवासमध्ये एका जॅकेट फॅक्टरीचे उद्घाटन केले आणि २५०० कोटी रुपयांच्या 'डिफेन्स प्रोजेक्ट'ची घोषणाही केली. दरम्यान उन्हाचा उल्लेख करत ते म्हणाले, "अडीच तास उभे राहून घामाच्या धारांमध्ये काम करणे सोपे नाही. माझा जेवढा घाम गळतो, तेवढा मला आनंद होतो. माझ्या गाडीत एसीही चालत नाही. मी एसीच्या वातावरणात राहत नाही. लोक विचारतात, ५१ अंश तापमानात तुम्ही कसे राहता? मी सांगतो की, ही चंबळची कातडी आहे."
ज्योतिरादित्य यांनी खिशातून कांदा काढून दाखवला -
उन्हापासून कशा प्रकारे बचाव करावा हे सांगताना शिंदे म्हणाले, "मी थोडा तरुण दिसतो पण आत्मा जरा म्हातारा आहे." यानंतर त्यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशात हात टाकला आणि उपस्थित जनतेला एक कांदा काढून दाखवला. यानंतर ते मिश्किलपणे म्हणाले, आधुनिक युगात लोक वेगवेगळे 'डबे' घेऊन फिरतात आणि हा दूरसंचार मंत्री खिशात कांदा घेऊन फिरतोय."
एवढेच नाही तर, "कांदा खिशात ठेवा, तुम्हाला काहीही होणार नाही. या जुन्या गोष्टी आहेत, आयुर्वेद पुढे जात आहे. आपणही या परंपरा विसरून चालणार नाही." याच बरोबर, जून महिन्यात ५१ अंश तापमान असले तरीही डोक्याला रुमाल बांधा, खिशात कांदा ठेवा आणि बाहेर पडा. तुम्हाला काही होणार नाही," असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.