राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:20 IST2026-04-27T18:19:22+5:302026-04-27T18:20:24+5:30
प्रशासकीय अनियमिततेवर ठेवले बोट

राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील वाढत्या वीज ट्रिपिंगच्या समस्येमागे प्रशासकीय अनियमितता कारणीभूत आहे. वायरमन, तांत्रिक विभाग, डेप्युटी इंजिनिअर तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर स्तरावर झालेल्या त्रुटींमुळे ही समस्या निर्माण झाल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील मोठ्या समस्येबाबत ज्येष्ठ मंत्र्यांनीच प्रशासकीय अनियमिततेवर बोट ठेवल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
वीज ट्रिपिंग प्रशासकीय अनियमिततेमुळे होत असून त्यात सुधारणा करण्यासाठी तातडीची पावले उचलली जात आहे. ऊर्जा विभाग या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत असून, वीज पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही यावर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महावितरणच्या धोरणानुसार दिवसा सौर ऊर्जेतून तयार होणारी वीज वापरली जाते; मात्र रात्री त्या युनिट्सचे बँकिंग होत नसल्याने ग्राहकांवर बिलाचा भार येतो, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींची ट्रम्पसोबत तुलना अयोग्य
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बावनकुळे यांनी भाष्य केले. भारताची संस्कृती आणि परंपरा समजून घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल १४० कोटी भारतीयांच्या मनात असलेला आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करणे अयोग्य आहे. वडेट्टीवार हे असे वक्तव्य करून पक्षांतर्गत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असून राहुल गांधी यांची शाबासकी मिळवण्याचा त्यांचा हेतू असू शकतो, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये नकोत
स्वामी धीरेंद्र शास्त्री त्यांनी माफी मागितली असून भारतीय संस्कृतीनुसार माफी स्वीकारली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे सांगत त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन बावनकुळे केले. चार मुलांच्या त्यांच्या वक्तव्यामागील भावना समाजहिताची असून संकटकाळात स्वयंसेवक समाजाच्या मदतीसाठी पुढे येतात. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती समाजकार्याशी जोडली गेल्यास समाज अधिक सक्षम होईल, अशी त्यामागील भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
खताची काळाबाजारी होऊ देणार नाही
खत विक्रेता संपाबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून कृषी विभाग व प्रशासन लक्ष ठेवून आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल. यावर्षी कोणतीही काळाबाजारी होऊ दिली जाणार नाही, आणि तसे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.