जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:04 IST2026-04-27T17:04:05+5:302026-04-27T17:04:15+5:30
Why smartphones become slow after 2 years : स्मार्टफोन कंपन्यांच्या 'प्लांड ऑब्सोलेसेन्स' धोरणाला युरोपीय संघाने लगाम लावला आहे. २०२७ पासून बॅटरी, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि स्पेअर पार्ट्सबाबत नवीन नियम लागू होणार आहेत. याचा भारतीय ग्राहकांना कसा फायदा होईल? वाचा सविस्तर.

जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
स्मार्टफोन कंपन्या नवीन मॉडेल्स विकण्यासाठी जुन्या फोन्सचा वेग मुद्दाम कमी करतात किंवा बॅटरी खराब करतात, असे अनेकदा आरोप झाले आहेत. २०१७ मध्ये ॲपलने स्वतः हे मान्य केले होते. मात्र, आता युरोपीय संघाच्या नवीन नियमांमुळे कंपन्यांना आपला फोन 'दीर्घायुषी' बनवावाच लागणार आहे. याचा भारतालाही थेट फायदा होणार आहे.
प्रत्येक स्मार्टफोनच्या बॅटरीने किमान ८०० चार्ज सायकल्सनंतरही ८०% क्षमता टिकवून ठेवली पाहिजे. यामुळे २-३ वर्षांनंतर अचानक बॅटरी उतरण्याचे प्रमाण थांबेल. कोणताही मॉडेल बंद झाल्यानंतरही कंपन्यांना पुढील ७ वर्षांपर्यंत त्याचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून द्यावे लागतील. तसेच, मागणी केल्यानंतर ५-१० दिवसांत त्याची डिलिव्हरी करणे बंधनकारक असेल.
जशी फ्रिजवर स्टार रेटिंग असते, तशीच आता फोनवर A ते E अशी 'रिपेअर रेटिंग' असेल. यामुळे ग्राहकांना समजेल की फोन खराब झाला तर तो दुरुस्त करणे किती सोपे किंवा कठीण आहे. सुरक्षा आणि फीचर्सच्या बाबतीत जुना फोन मागे पडू नये, यासाठी कंपन्यांना किमान ५ वर्षे अनिवार्य सॉफ्टवेअर अपडेट्स द्यावे लागतील.
भारतीय ग्राहकांसाठी याचे महत्त्व काय?
जरी हे नियम युरोपसाठी असले, तरी स्मार्टफोन कंपन्या प्रत्येक देशासाठी वेगळे हार्डवेअर डिझाइन करत नाहीत. त्यामुळे युरोपमध्ये होणाऱ्या या बदलांचा थेट सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेवर आणि ग्राहकांवरही होईल. या नवीन नियमांमुळे स्मार्टफोनचे सरासरी आयुष्य ३ वर्षांवरून वाढून ४.१ वर्षे होईल. यामुळे एका सरासरी कुटुंबाची वर्षाला सुमारे १०,७०० रुपयांची (९८ युरो) बचत होईल, असा अंदाज आहे.