"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
By संतोष कनमुसे | Updated: April 27, 2026 16:22 IST2026-04-27T16:01:29+5:302026-04-27T16:22:22+5:30
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुतीमधून अनेक नावांच्या चर्चा सुरू आहेत.

"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुतीमधून अनेक नावांच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी काळात पक्षवाढीसाठी अजितदादांचा वारसदार म्हणून जय पवार यांनाच संधी मिळावी, अशी उघड भूमिका मिटकरींनी मांडली आहे.
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग सुरू असतानाच मिटकरींनी थेट जय पवार यांचे नाव पुढे केले आहे. मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पक्षवाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू आणि युवा चेहरा पुढे आणण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे."
"घराणेशाही वाटली तरी चालेल"
"कदाचित इतरांना ही घराणेशाही वाटेल, पण ते वाटू देत. अजितदादांनंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी आश्वासक वाटतो. दादांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादीसाठी 'संजीवनी' ठरेल," असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
अमोल मिटकरींच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीतील एका जागेसाठी अनेक ज्येष्ठ नेते इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासु व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे.सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे.कदाचित… pic.twitter.com/ihKIqNEn9Q
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 27, 2026
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असली तरी इच्छुकांची संख्या मोठी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर उमेदवार निवडीची कसोटी आहे.
या नावांची चर्चा
या निवडणुकीतून पक्षातील निर्णय प्रक्रियेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दाखविण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी सात नावांची चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ कांबळे आणि उमेश पाटील यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.