कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:51 IST2026-04-26T11:48:53+5:302026-04-26T11:51:18+5:30
Kash Patel FBI Director resignation news 2026: FBI संचालक काश पटेल यांचे पद धोक्यात आले आहे. मद्यपानाचे आरोप, कामातील निष्काळजीपणा आणि नकारात्मक प्रसिद्धीमुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांना पदावरून हटवू शकतात. वाचा काश पटेल यांच्यावरील आरोपांची संपूर्ण यादी.

कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या संघराज्य तपास संस्थेचे संचालक काश पटेल लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना पदावरून हटवले जाऊ शकते. व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, "पटेल हे पद सोडणारे पुढील कॅबिनेट दर्जाचे अधिकारी असतील, ही आता केवळ वेळेची बाब आहे."
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पटेल यांच्याबद्दल माध्यमांमध्ये येत असलेल्या सातत्यपूर्ण नकारात्मक बातम्यांमुळे वैतागले आहेत. विशेषतः 'पॉलिटिको' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या वृत्तात पटेल यांच्यावर कामाच्या ठिकाणी मद्यपान करणे, महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहणे आणि सहकाऱ्यांशी गैरवर्तन करणे यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
काश पटेल यांच्यावर झालेले १० गंभीर आरोप:
१. मद्यपानाचे व्यसन: कार्यालयात मद्यपान करणे आणि बैठकांमधून गायब राहणे.
२. जुन्या गुन्ह्यांचा उलगडा: २००५ मध्ये विद्यार्थी असताना सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे आणि मद्यपान केल्याप्रकरणी अटकेची नोंद.
३. तांत्रिक गोंधळ आणि असुरक्षितता: एप्रिल २०२६ मध्ये संगणक लॉक झाल्यामुळे त्यांना वाटले की ट्रम्प यांनी त्यांना नोकरीवरून काढले आहे; त्यांच्या या घाबरलेल्या वर्तनावर टीका झाली.
४. विवादास्पद मेमो (२०१८): एफबीआयवर ट्रम्प यांच्या मोहिमेची हेरगिरी केल्याचा पक्षपाती आरोप केल्याचा ठपका.
५. युक्रेन प्रकरण (२०१९): राजनैतिक नियमांना बगल देऊन युक्रेनच्या व्यवहारात गुप्तपणे सहभागी असल्याचा आरोप.
६. सीआयए नियुक्तीला विरोध: २०२० मध्ये सीआयएच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नियुक्तीला तत्कालीन संचालिका जीना हास्पेल यांनी तीव्र विरोध केला होता.
७. कॅपिटल हिल हिंसाचार: ६ जानेवारी रोजी नॅशनल गार्डच्या तैनातीला उशीर केल्याचा आरोप.
८. गोपनीय कागदपत्रांचा दावा: मार-ए-लागो छाप्यानंतर कागदपत्रे 'डीक्लासिफाय' केल्याचा संशयास्पद दावा.
९. सूडबुद्धीचे राजकारण: ट्रम्प यांच्या विरोधकांवर आणि पत्रकारांवर कारवाई करण्याची उघड धमकी.
१०. वशिलेबाजी: व्यावसायिक अधिकाऱ्यांना हटवून ट्रम्प यांच्या समर्थकांची पॅनटागॉनमध्ये वर्णी लावणे.