पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:33 IST2026-04-26T11:32:53+5:302026-04-26T11:33:44+5:30
US Iran conflict 2026 update : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेसाठी आपल्या दूतांचा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
राण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जारेड कुशनर यांचा पाकिस्तान दौरा शेवटच्या क्षणी रद्द केला आहे. "इराणमध्ये नेमके निर्णय कोण घेत आहे हेच स्पष्ट नाही, अशा स्थितीत १८ तासांचा प्रवास करून वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही," अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ट्रम्प यांची 'वेट अँड वॉच' भूमिका
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, दौरा रद्द करण्याचा अर्थ पुन्हा युद्ध सुरू करणे असा होत नाही. मात्र, सध्या अमेरिका अत्यंत मजबूत स्थितीत असून "सगळे पत्ते आमच्या हातात आहेत," असा दावा त्यांनी केला. जर इराणला खरोखरच शांतता हवी असेल, तर त्यांनी स्वतः अमेरिकेशी संपर्क साधावा, असेही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले.
इराणची 'जबरदस्तीने चर्चा नाही' अशी अट
दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आम्ही दबाव आणि धमक्यांच्या सावलीत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नाही," असे त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवर बोलताना स्पष्ट केले. सागरी नाकेबंदी उठवणे ही चर्चेसाठीची प्रमुख अट असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांचा पाकिस्तान दौरा..
अमेरिकन अधिकारी पोहोचण्यापूर्वीच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानचा दौरा आटोपून रवाना झाले. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांची भेट घेऊन अमेरिकेच्या मागण्यांवर आपल्या हरकती आणि इराणच्या अटी सादर केल्या. इराणचे परराष्ट्र मंत्री निघून गेल्याने अखेर अमेरिकेने पाकिस्तानला न जाणेच पसंत केले आहे.
गेल्या २४ तासांतील ५ महत्त्वाच्या घडामोडी:
जर्मनीची एन्ट्री: हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवण्यासाठी जर्मनी आता आंतरराष्ट्रीय मोहिमेत सामील होणार आहे.
इस्रायलकडून ड्रोनचा मारा: वेस्टर्न गलीली भागात इस्रायलने हिजबुल्लाचा संशयास्पद ड्रोन पाडला, जो शस्त्रसंधीचे उल्लंघन मानले जात आहे.
'फातिमाची गोष्ट': इराणने २८ फेब्रुवारीच्या शाळा हल्ल्यात बळी पडलेल्या विद्यार्थिनीचा AI व्हिडिओ जारी करून जगाचे लक्ष वेधले आहे.
हज प्रवासाला सुरुवात: युद्धानंतर इराणमधील हज प्रवाशांचा पहिला जत्था सौदी अरेबियात पोहोचला असून, हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे संकेत मानले जात आहेत.
पाकिस्तानची शिष्टाई: इराणने अराघची यांचा पाकिस्तान दौरा अत्यंत 'उपयुक्त' असल्याचे वर्णन केले आहे.