वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:50 IST2026-04-26T11:49:44+5:302026-04-26T11:50:07+5:30
America President Donald Trump News: माझे सर्व मंत्रिमंडळ सहकारी सुरक्षित आहेत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
America President Donald Trump News: एकीकडे इराणशी सुरू असलेला संघर्ष शिगेला पोहोचला असताना तसेच इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ ठरत असताना दुसरीकडे वॉशिंग्टन येथे व्हाइट हाऊसच्या एका कार्यक्रमात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच हल्लेखोराने गोळीबार केला. परंतु, चाणाक्ष सुरक्षा रक्षकांना तत्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पुढील मोठा अनर्थ टळला.
व्हाइट हाऊस कॉरेस्पॉडेंट्स डिनर कार्यक्रमात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच गोळीबाराची घटना घडल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीने राष्ट्रपती ट्रम्प यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले. या कार्यक्रमात २६०० लोक जमले होते. या घटनेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाचा संदर्भ देत पहिली मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया
गोळीबारात एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला, पण त्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला. सिक्रेट सर्व्हिसने शौर्य दाखवत हल्लेखोरांपैकी एकाला तात्काळ पकडले. अशा भ्याड कृत्यांमुळे मी माझ्या ध्येयापासून परावृत्त होणार नाही. ही घटना मला इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकण्यापासून रोखू शकणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केले. तसेच ट्रम्प यांनी वॉशिंग्टन हिल्टनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भविष्यात 'ड्रोन-प्रूफ' आणि 'बुलेटप्रूफ' काचेने सुसज्ज अशी एक आधुनिक 'वॉर रूम' बांधण्याच्या गरजेवर भर दिला. सिक्रेट सर्व्हिसने मला, मेलानिया आणि व्हान्स यांच्यासह इतरांना ज्या वेगाने बाहेर काढले, ते कौतुकास्पद आहे. अटक करण्यात आलेला हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा असून तो आजारी आहे. माझे सर्व मंत्रिमंडळ सहकारी सुरक्षित आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.
दरम्यान, D.C. मधील सायंकाळ नाट्यमय ठरली. 'सीक्रेट सर्व्हिस' आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली. तत्परतेने आणि धैर्याने पावले उचलली आणि हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे; अशा परिस्थितीत आपण हा कार्यक्रम पुढे चालू ठेवावा, अशी शिफारस केली. या संदर्भात पूर्णपणे कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या मार्गदर्शनानुसार वागेन. लवकरच निर्णय कळवला जाईल. त्यांचा निर्णय काहीही असो, ही सायंकाळ नियोजित कार्यक्रमापेक्षा खूपच वेगळी ठरेल; आणि त्यामुळे अगदी साध्या शब्दांत सांगायचे तर, आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित करावा लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे.