ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:43 IST2026-04-24T13:37:06+5:302026-04-24T13:43:31+5:30

अमेरिकेत काही वर्षापर्यंत जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणात मदत हवी असेल तर सर्वात आधी Chegg चं नाव समोर यायचे. अमेरिकेतली ही कंपनी ऑनलाइन एज्युकेशनमधील नावाजलेली कंपनी होती. Chegg एके काळी अमेरिकेतील सर्वात मोठी EDTech कंपनी होती पण चार वर्षांत ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली आहे.

होमवर्क सॉल्व करणे असेल, प्रश्नांची उत्तरे हवी असतील, एखाद्या परीक्षेची तयारी करायची असेल तेव्हा लाखो विद्यार्थी या प्लॅटफॉर्मचा वापर करायचे. परंतु जेव्हापासून AI आले आणि विशेषत: ChatGPT आल्यानंतर संपूर्ण डावच बदलला. २०२१ च्या सुमारास Chegg ने उच्चांक गाठला होता आणि कंपनीचे मूल्यांकन जवळपास १५ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. परंतु त्यानंतर झालेली घसरण इतकी वेगवान होती की काही वर्षांतच कंपनीचे मूल्य जवळजवळ नाहीसे झाले.

खरं तर, Chegg संपूर्ण व्यवसाय मॉडेल हे विद्यार्थ्यांकडून प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पैसे देण्यावरच आधारित होते. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला जर एका प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर त्यासाठी त्याला सबस्किप्शन घ्यावे लागत असे. मात्र २०२२ साली जेव्हा ChatGPT आले तेव्हा पहिल्यांदा विद्यार्थ्यांजवळ असा टूल उपलब्ध झाला ज्यातून ते काम फ्रीमध्ये होऊ लागले. ChatGPT मधून योग्य आणि अचूक पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. तिथूनच Chegg कंपनीला उतरती कळा लागली.

जिथे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ लागायचा तिथे ChatGPT मुळे काही सेकंदात उत्तरे सापडू लागली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅटफॉर्मसाठी कुठलेही पैसे देण्याची गरज नाही. त्यातून Chegg चे पेड मॉडेलची गरज संपली.

हळू हळू त्याचा परिणाम अधिक जाणवू लागला. कंपनीचे यूजर्स कमी होऊ लागले. वेबसाईटवरील ट्रॅफिक कमी झाले. सर्वात मोठा धक्का सबस्क्रिप्शन बेस मॉडेलला बसला. AI टूल्स आल्यानंतर Chegg चे युजर्स आणि रेवेन्यू दोन्हीही वेगाने घसरू लागले.

चॅटजीपीटी (ChatGPT) आणि इतर AI साधनांमुळे त्यांच्या व्यवसायाला थेट नुकसान पोहोचले आहे हे Chegg ने स्वतः मान्य केले आहे. जेव्हा एआयमुळे कंपनीच्या वाढीला अडथळा येत असल्याचे पहिल्यांदा समोर आले, तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत एके वेळी ४०-५० टक्क्यांनी घसरली होती.

गुगलकडून Chegg कंपनीला आणखी एक मोठा धक्का बसला. आता एआय (AI) गुगल सर्चची उत्तरे देते, ज्यामुळे युजर्सला वेबसाइटवर जाण्याची गरज कमी झाली आहे. गुगलच्या एआय वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ट्रॅफिकमध्ये मोठी घट झाली असं चेग कंपनीने सांगितले. पूर्वी युजर्स गुगलवरून चेगच्या वेबसाइटला भेट देत असत, पण आता त्यांना तीच उत्तरे थेट गुगलवर मिळतात. यामुळे चेगच्या ट्रॅफिकमध्ये आणखी घट झाली.

चेगचे संपूर्ण मॉडेल एकाच गोष्टीवर आधारित होते हे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांची सर्वात मोठी चूक ही होती ते म्हणजे होमवर्कसाठी मदत.. जसे एआयने तीच कामे अधिक चांगल्या प्रकारे आणि स्वस्तात करण्यास सुरुवात केली, तसे कंपनीकडे टिकून राहण्यासाठी फार कमी पर्याय उरले. शिवाय चेग एआयशी जुळवून घेण्यासाठी पुरेशा वेगाने बदल करू शकली नाही.

कंपनीने आपली एआय उत्पादने बाजारात आणली तोपर्यंत विद्यार्थ्यांना चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या साधनांची सवय झाली होती. परिस्थिती इतकी गंभीर झाली की कंपनीला मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करावी लागली, हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे लागले आणि खर्चात कपात करण्याचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले.

कंपनीची आर्थिक परिस्थितीही कमकुवत झाली. २०२५ मध्ये कंपनीचा महसूल अंदाजे ४०-५०% ने घटला आणि तोटा वाढला. चेग ही माहिती विकणारी कंपनी होती, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सने माहिती विनामूल्य आणि त्वरित उपलब्ध करून दिली. हाच तिच्यासाठी सर्वात मोठा धोका बनला. चॅटजीपीटीने चेगला थेट नष्ट केले नाही परंतु त्या कंपनीचा व्यवसाय इतका कमकुवत केला की ती बाजारात टिकू शकली नाही.