'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:20 IST2026-04-24T15:18:25+5:302026-04-24T15:20:01+5:30
Aaditya Thackeray letter to CM Devendra Fadnavis: पावसाळा तोंडावर आला असताना हे पत्र देण्यात आले आहेत

'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
Aaditya Thackeray letter to CM Devendra Fadnavis: पावसाळा तोंडावर असताना मुंबईतील मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) आणि पागडी इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरळी विधानसभेचे आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील हजारो कुटुंबांचा जीव टांगणीला लागला असून, पावसाळ्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पुनर्विकासाची प्रक्रिया ठप्प, भाडेकरूंची सुरक्षा धोक्यात
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे की, मुंबईत सुमारे १३,५०० हून अधिक उपकरप्राप्त इमारती आहेत. मात्र, पुनर्विकासाच्या संदर्भातील सेक्शन ७९ (अ) आणि ७९ (ब) यांमधील न्यायालयीन स्थगितीमुळे या इमारतींचा पुनर्विकास सध्या पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या इमारती आता अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींमध्ये राहणारे भाडेकरू अत्यंत असुरक्षित परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत. पावसाळा जवळ येत असल्याने या धोकादायक इमारती कोसळण्याची भीती असून, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य ओळखून पावसाळ्यापूर्वी या इमारतींची डागडुजी होणे अत्यावश्यक आहे.
म्हाडाकडून विशेष निधीची मागणी
सध्याच्या नियमांनुसार, म्हाडाला अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रति चौरस मीटर केवळ ४००० रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. मात्र, इमारतींची दयनीय अवस्था पाहता हा निधी अत्यंत अपुरा पडत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, एक 'विशेष प्रकरण' म्हणून सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारने म्हाडाला विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून या इमारतींची तातडीने आणि आवश्यक ती दुरुस्ती करता येईल, अशी आग्रही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही पत्राद्वारे या विषयावर सरकारला अवगत केले होते. आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे मुंबईतील हजारो भाडेकरूंचे लक्ष लागले आहे.
