Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
LIVE
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 11:06 IST2026-04-24T10:04:57+5:302026-04-24T11:06:55+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
24 Apr, 26 : 12:20 PM
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची भ्रष्टाचार चौकशी आता निवृत्त न्यायाधीश मार्फत होणार; पडळकर यांची माहिती
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी आता निवृत्त न्यायाधीशामार्फत होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कथेत भ्रष्टाचार प्रकरणी बँकेचे 88 कलमांतर्गत चौकशी सुरू असून जिल्हा उपनिबंधक अधिकारया मार्फत चौकशी सुरू होती,मात्र आता चौकशीमध्ये पारदर्शकपणा यावा, म्हणून मुख्यमंत्र्यांकडून निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
24 Apr, 26 : 12:18 PM
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू
छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयातील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण निर्माण झाला असून रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत असून, रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थिनींची मदत घेतली जात आहे. दरम्यान, हा संप महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आला आहे.
24 Apr, 26 : 11:17 AM
पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानी गँगस्टर्स आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना नोएडातून अटक केली आहे. एटीएसने त्यांच्याकडून ३२ बोरचे एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसं, एक चाकू आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. वाचा सविस्तर
24 Apr, 26 : 11:06 AM
पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही
पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात सकाळपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. गुरुवारी दिवसभर पाणी येणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल अशीही माहिती देण्यात आली होती. मात्र सकाळपासून अजिबातच पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
24 Apr, 26 : 11:06 AM
अवकाळी पाऊस, वादळामुळे सावंतवाडीत मोठं नुकसान, दीपक केसरकर यांनी केला पाहणी
अवकाळी पाऊस, वादळामुळे सावंतवाडीत मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अवकाळी पावसात नुकसान झालेल्या घटनास्थळावर शुक्रवार सकाळी आमदार दीपक केसरकर नगराध्यक्षा श्रद्धा भोसले नगरसेवक अजय गोंदावले आदींनी भेट देऊन पाहणी केली तसेच लवकरात लवकर मदतकार्य पोचवले जाईल असे आश्वासन दिले.
24 Apr, 26 : 10:34 AM
पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाकडून काँग्रेसविरोधात आंदोलन
महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर भाजप महिला मोर्चा पुण्यात आक्रमक झाला आहे. तसेच भाजपच्या महिला मोर्चाकडून काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
24 Apr, 26 : 10:31 AM
मराठीला विरोध करणारे महाराष्ट्राचे शत्रू, संजय राऊतांचा घणाघात
मराठीला विरोध हा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून होत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची आहे. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी आणि महाराष्ट्राचे शत्रू आहे. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून इथे लोक कसं काय राहू शकतात. महाराष्ट्रात राजधानीत मुंबईमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले.
24 Apr, 26 : 10:23 AM
उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसनं समर्थन दिलं आहे. तसंच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरेंना विधान परिषदेसाठी गळ घातल्याचं समजतं.
24 Apr, 26 : 10:23 AM
नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
नाशिक - जिल्ह्यात भोंदू अशोक खरातचे कारनामे चर्चेत असतानाच महिला लैंगिक शोषणाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार गुरुवारी लासलगाव पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भोंदूबाबा महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)
24 Apr, 26 : 10:21 AM
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळून जखमी झाल्याची घटना मुंबईतील भांडुपमधील जनता मार्केट परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर आठ जणांची प्रकृती स्थिर आहे. (सविस्तर वाचा)
24 Apr, 26 : 10:20 AM
महाराष्ट्राच्या राजकारणात 'मिशन विधानपरिषद'
विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला काही नावं पाठवल्याची माहिती आहे. डॉ. राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर, माजी आमदार प्रज्ञा सातव, राजा राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, माधव भांडारी, माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्यासह २३ नावं पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहावं लागेल.