मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:48 IST2026-04-24T10:47:46+5:302026-04-24T10:48:39+5:30
या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यांच्या मनात भीती आणि असंतोष वाढत आहे.

मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
मुंबई - १ मे पासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आले आहे. आरटीओकडून मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. याविरोधात अमराठी रिक्षाचालकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यात शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या भूमिकेला पक्षातूनच संजय निरुपम यांनी विरोध केला आहे. निरुपम यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारे पत्र मंत्री प्रताम सरनाईक यांना पाठवले आहे.
संजय निरुपम यांनी पत्रात म्हटलंय की, राज्य शासनाने १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा घेतलेला निर्णय अनेक कष्टकरी, चालकांच्या मनात भीती, संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा ठरत आहे. मराठी भाषेचा सन्मान, तिचा अभिमान, तिचे जतन हे आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेले आहे. याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र भाषेच्या प्रेमाला सक्तीची चौकट घालणे आणि त्यासाठी परीक्षा लादणे हे हजारो कष्टकरी चालकांच्या जगण्यावर आघात करणारे ठरू शकते असं त्यांनी सांगितले.
ऑटो-टैक्सी चालकों से कामचलाऊ मराठी भाषा में
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 23, 2026
संवाद करने की अपेक्षा करिए मगर भाषा की सख्ती मत लादिए।
इससे उनकी रोज़ी-रोटी पर संकट आ जाएगा।
कृपया अपने फ़ैसले पर पुनर्विचार करें।
परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक को लिखा मेरा पत्र।@PratapSarnaikpic.twitter.com/oaVJNPJVMV
तसेच मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक महानगरात सुमारे ७० टक्क्याहून अधिक रिक्षा टॅक्सी चालक हे गुजरात, उत्तर भारत, पंजाब तसेच दक्षिण भारतातील विविध भागांमधून येथे आलेले आहेत. त्यांनी आपल्या कष्टाने या शहरात स्थान निर्माण केले आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामाणिकपणे चालवला आहे आणि मुंबईच्या गतिमान जीवनशैलीला चालना दिली आहे. अशावेळी या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यांच्या मनात भीती आणि असंतोष वाढत आहे. त्यातून मुंबईच्या दैनंदिन वाहतूक व्यवस्थेलाही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे असं संजय निरुपम यांनी पत्रात म्हटलं.
दरम्यान, माझ्याकडे अनेक चालकांचे फोन येत असून त्यांच्या व्यथा ऐकताना मन अक्षरश: हेलावून जाते. त्यांच्या डोळ्यातील असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची चिंता अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान अबाधित ठेवत तुटक, कामचलाऊ मराठी समजणाऱ्या व बोलणाऱ्या चालकांना सवलत देण्यात यावी. भाषा ज्ञानाची सक्ती आणि परीक्षा घेण्याचा निर्णय पुनर्विचार करून मागे घ्यावा. प्रेमाने शिकवलेली भाषा हृदयात घर करते पण सक्तीने लादलेली भाषा मनात भीती निर्माण करते. या विषयाकडे सहानुभूतीने, मानवतेच्या दृष्टीने पाहून योग्य तो निर्णय घ्याल असा विश्वास संजय निरुपम यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केला.