“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:56 IST2026-04-24T15:55:44+5:302026-04-24T15:56:42+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक आपल्यासाठी मोठा दस्तावेज आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
Congress Harshwardhan Sapkal News: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आमदार संजय गायकवाड हे सातत्याने दादागिरी व गुंडगिरी करत असतात. आमदार कॅटिंनमध्ये कामगारांना मारहाण करणे, बुलढाण्यात वाळू तस्करी, जबरदस्तीने जमीन बळकावणे, कोणालाही अत्यंत खालच्या भाषेत शिविगाळ करणे, ही त्यांची गुन्हेगारी कृत्त्ये सुरूच आहेत. भाजपात हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला दिलेल्या शिव्यांची तरी दखल घेऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी, पण मुख्यमंत्री मात्र याला आमदाराला पाठीशी घालत आहेत, असा दावा सपकाळ यांनी केला.
‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक मोठा दस्तावेज
‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक आपल्यासाठी मोठा दस्तावेज आहे, पण या पुस्तकावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही अपमान केला. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यासारख्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यावेळीही सरकारने बोटचेपी धोरण स्विकारले होते. भगतसिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांचा अपमान केला, त्यावेळीही काहीच कारवाई केली नाही. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांचे सरकार एक प्रकारे समर्थनच करत आहेत, असे यावरून दिसते, असेही सपकाळ म्हणाले.
दरम्यान, रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठीचे संवर्धन झालेच पाहिजे, त्यावर दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा अवगत झाली पाहिजे पण त्यासाठी सक्ती करण्याची गरज नाही, हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रकार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण त्यापुढे सरकारने काहीच केले नाही, राज्यातील सरकारी खासगी अशा प्रत्येक विद्यापीठात मराठीचा स्वतंत्र विभाग निर्माण केला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.