इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 19:53 IST2026-04-24T19:53:11+5:302026-04-24T19:53:45+5:30
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता, याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायलची सत्ता सांभाळणारे आणि 'आयर्न मॅन' अशी ओळख असलेले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या आरोग्याबाबत एक अत्यंत धक्कादायक पण दिलासादायक खुलासा केला आहे. नेतन्याहू यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, ज्यावर त्यांनी अत्यंत गुप्तपणे उपचार घेऊन आता विजय मिळवला आहे.
आज (२४ एप्रिल २०२६) प्रसिद्ध झालेल्या वार्षिक आरोग्य अहवालात नेतन्याहू यांनी स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला दिली. त्यांनी सांगितले की, २०२४ च्या अखेरीस एका वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यांना प्रोस्टेट कर्करोग असल्याचे आढळले होते. डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातील एक सेंटीमीटरचा छोटा ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढून टाकला आहे.
निदान गुप्त का ठेवले? इराणचे कनेक्शन...
नेतन्याहू यांनी हे निदान इतके दिवस गुप्त ठेवण्यामागे मोठे राजकीय कारण होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, "इराणसारख्या शत्रू राष्ट्रांनी या आजाराचा फायदा घेऊन इस्रायलविरुद्ध अफवा पसरवू नयेत, यासाठी मी ही माहिती लपवून ठेवली होती." सध्या इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रकृतीबाबत कोणतीही 'फेक न्यूज' पसरू नये, अशी त्यांची इच्छा होती.
"मी पूर्णपणे फिट आहे!"
नेतन्याहू यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, "मी आता पूर्णपणे ठणठणीत आहे. कर्करोगाचा कोणताही अंश आता माझ्या शरीरात उरलेला नाही." जेरुसलेममधील 'हदासा रुग्णालयात' त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दीड वर्षांपूर्वी या आजाराची चिन्हे दिसली होती, पण नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार ते आता कॅन्सर मुक्त झाले आहेत.
नेतन्याहूंचा राजकीय प्रवास आणि संघर्ष
नेतन्याहू हे १९ वर्षांपासून इस्रायलचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या कार्यकाळात इस्रायलने हमास, हिजबुल्लाह यांसारख्या संघटनांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ७६ वर्षांचे असूनही त्यांच्यातील ऊर्जा आणि आता कर्करोगासारख्या आजारावर मिळवलेला विजय, यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.