पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 22:21 IST2026-04-24T22:20:45+5:302026-04-24T22:21:06+5:30
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री भरवर्दळीच्या वेळी घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री भरवर्दळीच्या वेळी घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीसह टोळीने सलूनमध्ये घुसून एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत लक्ष्य केलेल्या तरुणासह एका निष्पाप नागरिकालाही गोळी लागून दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निहाल शिंदे हा तरुण वारजे माळवाडी येथील एका सलूनमध्ये बसला असताना सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास ५ ते ६ जणांचे टोळके दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झाले. पूर्ववैमनस्यातून त्यांनी थेट सलूनमध्ये घुसून निहालवर गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या अंदाधुंद गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या गोळीबारात अमोल आढाव हा निष्पाप तरुणही जखमी झाला. तो केवळ केस कापण्यासाठी सलूनमध्ये आला असताना त्याला गोळी लागली. दोन्ही जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटनेच्या वेळी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या वारजे माळवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका आरोपीला घटनास्थळीच पकडण्यात पोलिसांना यश आले, तर इतर आरोपी पसार झाले आहेत.
प्राथमिक तपासात, या गोळीबारामागे जुना वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीचा सहभाग असल्याची माहिती समोर येत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नुकतेच उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्स प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर लगेचच अशा प्रकारे गोळीबाराची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले असून फरार आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.