Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 22:30 IST2026-04-24T22:30:22+5:302026-04-24T22:30:48+5:30
समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा दाखविला जाणार

AI Generated Image
नागपूर : प्रवाशांना भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा बघता, अनुभवता यावा, यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने भारत गाैरव पर्यटन रेल्वे सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून खास स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून पुरी कामाख्या बैद्यनाथ धाम तसेच नागपूरपासून दिव्य दक्षिण यात्रा भाविकांना घडविली जाणार आहे.
आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग आणि पर्यटन व्यवस्थापक सुभाष नायर तसेच अमोल अलदनकर यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली.
पुरी, कामाख्या, जसिडीह, वाराणसी बैद्यनाथ धाम अयोध्या यात्रा २५ जूनला पुण्यातून सुरू होणार आहे. पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नासिक, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर येथून या ट्रेनमध्ये प्रवासी चढू शकणार आहेत. या यात्रेचा खर्च प्रति व्यक्ती २२,७७० रुपयांपासून तो५४, ३६० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या क्लासनुसार राहणार आहे.
अशाच प्रकारे दिव्य दक्षिण यात्रा नागपुरातून २६ मे ते ६ जून दरम्यान राहणार आहे. हम्पी, म्हैसूर, कोईम्बतूर, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, तिरूपती आणि मल्लिकार्याजून आदी धार्मिक स्थळांच्या या यात्रेचा प्रति व्यक्ती संपूर्ण खर्च २१,६९० ते ५०,२३० पर्यंत आवडीनुसार राहणार आहे.
पॅकेज मध्ये सर्वच व्यवस्था
दोन्ही यात्रा ११ रात्री आणि १२ दिवसांच्या राहणार असून, नमूद खर्चात भाविकांना चहा, नाश्ता, दोन्ही वेळेचे शुद्ध शाकाहारी जेवण, राहण्याची व्यवस्था आणि प्रेक्षणिय स्थळांवर वेगळ्या वाहनांनी फिरण्याची व्यवस्था आयआरटीसीकडून केली जाणार आहे. प्रवासी त्यांच्या सोयीप्रमाणे इकॉनॉमी स्लीपर, स्टँडर्ड थ्रीएसी आणि कम्फर्ट टूएसीची श्रेणी निवडू शकतात. ट्रेनची क्षमता ७५० प्रवाशांची आहे, असेही यावेळी उपरोक्त अधिकाऱ्यांनी सांगितले.