आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 19:49 IST2026-04-24T19:41:52+5:302026-04-24T19:49:42+5:30
Rajya Sabha Members Party Wise: राज्यसभेत सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असलेल्या आम आदमी पक्षाला झटका बसला आहे. चौथ्या क्रमांकावरील पक्ष आता लांब फेकला गेला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी राजकीय भूकंप झाला. आपने राज्यसभेच्या उप गटनेते पदावरून हटवलेल्या खासदार राघव चड्डा यांच्या नेतृत्वात तब्बल सात खासदारांचा गट फुटला. सात खासदारांचा गट भाजपामध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे.

भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या आता ११३ वर पोहोचली आहे. राज्यसभेत सर्वाधिक खासदार असलेला दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसचे २९ खासदार आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष अशून, त्यांचे १३ खासदार आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आम आदमी पार्टी होती. पण, त्यांचे सात खासदार फुटल्याने आता फक्त ३ खासदारच असणार आहेत. डीएमकेचे राज्यसभेत ८ खासदार आहेत. त्यापाठोपाठ ७ खासदार राष्ट्रपती नियुक्त आहेत. वायएसआर काँग्रेसचे ७ खासदार आहेत. बीजू जनता दलाचे ६, अण्णाद्रमुकचे ५ खासदार, नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)चे ४ खासदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ४ खासदार, समाजवादी पक्षाचे ४ खासदार आहेत. त्यानंतर भारत राष्ट्र समिती, सीपीआय (एम), अपक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय जनता दल यांचे प्रत्येकी तीन खासदार आहेत. त्यानंतर सीपीआय, आययूएमएल, झारखंड मुक्ती मोर्चा, शिंदेसेना, तेलगू देसम, यूनायटेड पीपल्स पार्टी यांचे प्रत्येकी दोन खासदार आहेत.

गोवा आसाम गण परिषद, बसपा, डीएमडीके, जनता दल (धर्मनिरपेक्ष), केरळा काँग्रेस (एम), एमएनएम,मिझो नॅशनल फ्रंट, नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), पीएमके, आरएलडी,आरएलएम,आरपीआय आठवले, उद्धवसेना यांचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेत आहेत.

















