तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
By मनीषा म्हात्रे | Updated: April 24, 2026 17:50 IST2026-04-24T17:49:02+5:302026-04-24T17:50:48+5:30
Bhandup accident news today: मुंबईतील भांडुपमध्ये लग्नात मुलीची छेड काढल्याच्या वादातून वऱ्हाडी बांधकामाधीन इमारतीच्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळले.

तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
- मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरात एका साध्या “हाय”मुळे सुरू झालेला वाद थेट भीषण अपघातात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेच्या वेळी लग्न उरकून काही वऱ्हाडी हॉलच्या बाहेर गप्पा मारत उभे होते. त्याच दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या तिघांपैकी एका युवकाने वऱ्हाडातील एका मुलीला हात दाखवत “हाय” केले. यावरून वाद चिघळताच तिघांनी पळ काढला आणि जवळच सुरू असलेल्या बांधकामाधीन इमारतीत शिरले. त्यांना पकडण्यासाठी वऱ्हाडीही पळाले. त्यादरम्यान बेसमेन्टमधून एक जण खाली कोसळला. त्याला पाहण्यासाठी बांधकाम साईटवरील कर्मचारी अन्य वऱ्हाडी एका तात्पुरत्या उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर चढताच प्लॅटफॉर्म कोसळला. आणि वऱ्हाडी थेट २० फूट खोल खड्ड्यात पडल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी आहे.
भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास काका पेट्रोल पंप येथील मातेश्वरी हॉलमागील बाजूस सुरू असलेल्या लग्न समारंभात एका मुलीची छेड काढण्यावरून वाद झाला. छेड काढणाऱ्या अनोळखी मुलाला पकडण्यासाठी काही जण त्यांच्या मागे गेले. तर भालचंद्र पिले हा श्रद्धा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग येथे ग्राउंड फ्लोअरवरून दुसरीकडे गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या मागे लग्नातील काही जण मागे गेले. तेथे एक लाकडी फळीने तसेच पत्र्याने झाकलेली बांधकामाधीन साईटवरील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची टाकी होती. तेव्हा सदर व्यक्ती तिकडे गेला असता लग्नात आलेल्या व्यक्तींपैकी एक जण या टॅंकसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला व त्याला एसटीपी टॅंक मधून बाहेर काढण्यासाठी आणखीन काही जण गेले. ते ज्या प्लॅटफॉर्मवर उभे होते तो तात्पुरता स्वरूपात बांधण्यात आला होता. त्यावर एकाच वेळी जास्त जण उभे राहिल्याने तो प्लॅटफॉर्म तुटून सगळे जण खाली कोसळले. या घटनेत एकूण लग्नातील ६ व्यक्ती व तीन बांधकाम कामगार असे ९ जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात भालचंद्र गणेश पल्ले (२५) याचा मृत्यू झाला आहे.
जखमींची नावे
अनिकेत महेश पाटील (२१), श्रेयस संदीप सुर्वे (२५), ऋषिकेश केशव कदम (२५), आदित्य शिवाजी आहेर (२५), संकेत नामदेव जुवाटकर (२५) यांच्यासह कामगार जयदत्त पंचानंत शहा (२१), अंकित कुमार रॉय (१९), मजूर हरिशंकर पासवान (२५) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर मुलुंडसह विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.
स्लॅब कोसळल्याच्या चर्चेने खळबळ
रात्री घटना घडल्यानंतर इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या चर्चेने खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ बाहेर काढत खासगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल केले.
विकासकाविरुद्ध गुन्हा
चौकशीत लग्नासाठी आलेल्या ग्रुपमधील एका मुलीला समोरील तीन जणांच्या गृपमधील मुलाने हात दाखवून "हाय" केला. त्यावरून वाद झाला. ते सगळे बाजूच्या निर्माणधिन इमारतीत शिरले. एक जण खाली पडला म्हणून त्याला वाचवण्यासाठी एका तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर चढले. तोच प्लॅटफॉर्म कोसळून ते खाली कोसळल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये नेमका घटनाक्रम समजून घेण्यात येत आहे. मृताच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपावरून श्रद्धा डेव्हलपर्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
- हेमराजसिंह राजपूत पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७