'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:31 IST2026-04-24T17:26:20+5:302026-04-24T17:31:43+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारत आणि चीनचा उल्लेख करत या देशांना नरक संबोधले. त्यांच्या या विधानावर आता चीननेही भूमिका मांडली.

'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण कुटुंबाला मग तो चीन असो भारत वा जगाच्या इतर कुठल्या नरकातून घेऊन येतं.' अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ट्रम्प यांच्या या विधानावर आता भारत-चीन ध्वज शेअर करत चीन दूतावासाच्या प्रवक्त्याने तिखट भाषेत सुनावले आहे.
भारतातील चीन दूतावासातील प्रवक्त्या यू जीन यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट शेअर केली आहे.
चीनने ट्रम्प यांना सुनावले
ही पोस्ट शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, "व्हायरल झालेले शब्द विरून जातात. पण, खरी भागीदारी संपून जात नाही. द्विपक्षीय संबंध हे बडबडीवर नाही, तर एकमेकांच्या सन्मानावर टिकून असतात", अशा शब्दात त्यांनी ट्रम्प यांना सुनावले.
Viral words fade. 🌬️
— Yu Jing (@ChinaSpox_India) April 24, 2026
Real partnerships don't. 🤝
Bilateral ties are built on respect, not rhetoric. 🇨🇳🇮🇳 pic.twitter.com/RgRtDWfmTv
ट्रम्प यांनी जी पोस्ट शेअर केली होती, त्या पोस्टमध्ये भारत आणि चीन हे देश नरक असल्याचे म्हटले होते.
भारताचेही ट्रम्प यांना उत्तर
ट्रम्प यांच्या या वादग्रस्त विधानावर भारताने भाष्य करताना म्हटलेले आहे की, आम्ही अमेरिकेच्या अध्यक्षांचे विधान आम्ही बघितले आहे आणि त्यावर अमेरिकेच्या दूतावासाने दिलेली प्रतिक्रिया वाचली आहे. हे विधान कोणत्याही माहितीशिवाय आणि चुकीचे आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे प्रतिबिंब या विधानामध्ये नाहीये. दोन्ही देशांचे संबंध दीर्घकाळापासून आणि एकमेकांचा सन्मान आणि हितांचा आदर करून टिकलेले आहेत", भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले.