समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 22:16 IST2026-04-24T22:15:51+5:302026-04-24T22:16:48+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या नौकांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.

समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटण्याची ठिणगी आता होर्मुझ सामुद्रधुनीत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या संशयास्पद नौका दिसताच त्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश अमेरिकन नौदलाला दिले आहेत. इराणकडून या महत्त्वाच्या समुद्री मार्गात सुरू असलेल्या खाणी पेरण्याच्या हालचाली रोखण्यासाठी ट्रम्प यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन होर्मुझ?
होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. इराण आपल्या वेगवान नौकांचा वापर करून या मार्गावर माईन्स पेरत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. यामुळे जगाचा तेल पुरवठा विस्कळीत होऊन अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा इराणचा प्रयत्न आहे. याला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांनी दोन स्तरावर रणनीती आखली आहे:
१. थेट हल्ला: इराणच्या माईन्स पेरणाऱ्या कोणत्याही नौकेला न विचारता थेट नष्ट करणे.
२. सफाई मोहीम: समुद्रात आधीच पेरलेल्या माईन्स शोधून त्या नष्ट करणे. यासाठी अमेरिका जपानसारख्या मित्रराष्ट्रांची मदत घेण्याच्या तयारीत आहे.
'लॉक आणि लोडेड'; पेंटागनचा इशारा
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पेंटागनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, अमेरिकन नौदल सध्या 'लॉक आणि लोडेड' मोडमध्ये आहे. "होर्मुझमधून आता अमेरिकेच्या परवानगीशिवाय कोणतीही हालचाल होणार नाही. इराणच्या जहाजांना पूर्णपणे रोखले जाईल, तर इतर देशांच्या जहाजांना परवानगी घेऊनच प्रवास करावा लागेल," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
इस्रायल 'ग्रीन सिग्नल'च्या प्रतीक्षेत
या संपूर्ण संघर्षात इस्रायलनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणवर पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्यासाठी इस्रायल सज्ज असून केवळ अमेरिकेच्या संमतीची वाट पाहत आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार, यावेळी केवळ लष्करी तळच नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांनाही लक्ष्य केले जाऊ शकते.
जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका?
होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज कोट्यवधी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. जर येथे युद्ध पेटले, तर जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव गगनाला भिडतील. ट्रम्प यांची ही आक्रमक पवित्रा इराणला नमवण्यासाठी आहे की जगाला महायुद्धाच्या खाईत लोटण्यासाठी, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.