नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 19:15 IST2026-04-24T19:07:17+5:302026-04-24T19:15:10+5:30
नेपाळच्या प्युठान जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात २ भारतीयांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत.

नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
नेपाळमधील प्युठान जिल्ह्यात भाविकांच्या बसला झालेल्या एका भीषण अपघातात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३५ वर्षीय महिला आणि एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मदत जाहीर केली आहे.
नेमकी घटना काय?
भारतीय भाविकांना घेऊन जाणारी ही बस प्युठान जिल्ह्यातील डोंगराळ भागात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात निर्मला (३५) आणि काव्या (६) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये चालकासह एकूण २३ जण होते, त्यापैकी १९ जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना नेपाळमधील बुटवल येथील लुंबिनी सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
भारत-नेपाळ प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकारी आणि नेपाळच्या रुपनदेही जिल्हा प्रशासनामध्ये तातडीने समन्वय साधण्यात आला. भारताकडून १० रुग्णवाहिकांसह 'अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट' टीम तात्काळ नेपाळमध्ये पाठवण्यात आली. नौतनवाचे उपविभागीय दंडाधिकारी नवीन प्रसाद यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले असून, सोनौली सीमेवर एडीएम दर्जाचे अधिकारी तळ ठोकून आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
या हृदयद्रावक घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असून, सर्व जखमींना भारतात परत आणण्यासाठी आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. नेपाळ प्रशासनानेही या संकटकाळात भारताला पूर्ण सहकार्य केले असून, जखमींच्या कुटुंबीयांना नेपाळला जाण्यासाठी सीमेवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.