राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:57 IST2026-04-24T16:57:01+5:302026-04-24T16:57:58+5:30
Raghav Chadha career before politics : राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडला आहे. राजकारणात येण्यापूर्वी चड्ढा एक यशस्वी सीए होते आणि त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतले होते. अण्णांच्या आंदोलनातून त्यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला?

राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला...
आम आदमी पक्षाचे चाणक्य आणि अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे राघव चड्ढा यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठी आणि चड्ढा यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा आज अंत झाला. राघव चड्ढा यांनी केवळ पक्षाचा राजीनामाच दिला नाही, तर आपल्यासोबत इतर ८ खासदारांनाही भाजपच्या वाटेवर नेले आहे. राजकारणात येण्यापूर्वी एक यशस्वी व्यावसायिक कारकीर्द गाजवणारे चड्ढा 'आप'चे सर्वात तरुण आणि प्रभावी चेहरे मानले जात होते.
२२ व्या वर्षी सीए आणि लंडनहून परतीचा प्रवास
राजकारणात येण्यापूर्वी राघव चड्ढा हे एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट होते. दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया'मधून सीएची पदवी मिळवली. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी सीएचा परवाना मिळवला होता आणि इतक्या कमी वयात ते देशातील 'हाय टॅक्स पेयर' श्रेणीत आले होते. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले आणि 'डेलॉइट' व 'ग्रँट थॉर्नटन' यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले.
अण्णांच्या आंदोलनातून केजरीवाल यांच्याशी भेट
२०१३ मध्ये जेव्हा अण्णा हजारे यांचे 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलन शेवटच्या टप्प्यात होते आणि अरविंद केजरीवाल रामलीला मैदानावर संघर्ष करत होते, तेव्हा राघव चड्ढा लंडनहून परतले होते. तिथेच त्यांची आणि केजरीवाल यांची भेट झाली. केजरीवाल यांनी त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना दिल्ली जनलोकपाल बिल ड्राफ्ट करणाऱ्या राहुल मेहरा यांना सहकार्य करण्याची पहिली जबाबदारी दिली.
'व्हॉलेंटियर' ते पक्षाचा सर्वात मोठा चेहरा
राघव चड्ढा यांचा 'आप'मधील प्रवास थक्क करणारा आहे. २०१३ चा पक्षाचा पहिला जाहीरनामा तयार करणाऱ्या टीममध्ये त्यांचा समावेश होता. काही काळ त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आणि शांत स्वभावामुळे ते लवकरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये आम आदमी पक्षाची बाजू मांडणारा सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. केजरीवाल यांचे सर्वात विश्वासू मानले जाणारे चड्ढा आता त्यांच्यापासून दूर गेल्यामुळे 'आप'साठी ही मोठी पोकळी ठरणार आहे.