"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:27 IST2026-04-24T17:27:18+5:302026-04-24T17:27:51+5:30
तन्वीचं लग्नाबद्दलचं प्लॅनिंग आहे तरी काय? तन्वीच्या आयुष्यात कोणी आहे का? याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.

"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन काही दिवसांपूर्वीच संपला. अभिनेत्री तन्वी कोलते या सीझनची विजेती झाली. तर राकेश बापट दुसऱ्या क्रमांकावर होता. घरात असताना भांडणामध्ये काही वेळा तन्वी म्हणायची की 'काहीही बोलू नका, मला बाहेर जाऊन लग्न करायचंय'. तन्वीचं लग्नाबद्दलचं प्लॅनिंग आहे तरी काय? तन्वीच्या आयुष्यात कोणी आहे का? याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तन्वी कोलते म्हणाली, "मला आधी करिअरशीच लग्न करायचंय. मुळात मी घरात पहिल्या दिवसापासूनच सांगत होते की मी गेम शोमध्ये कधीच अफेअर वगैरे करणार नाही. लव्ह अँगल देणार नाही. कारण तीन महिन्यात कोणालाच प्रेम होऊ शकत नाही. मला तर कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात हे स्पष्ट होतं की जाणार तर एकटी जाणार, एकटीच बाहेर पडणार, खेळून बाहेर पडणार, छान खेळणार. मी कायम हेही बोलत आले आहे की माझी आई माझ्यासाठी मुलगा बघणार. हो, मी अशीच आहे. मला फटकळ म्हणतात, बोल्ड-बिंधास्त म्हणतात. मी खूप जुन्या विचारांची आहे. माझी आई सांगेल त्याच्याशीच मी लग्न करेल."
बिग बॉसमध्ये असताना तन्वीचं नाव आयुष संजीवसोबत जोडलं गेलं होतं. आयुषने दुर्लक्ष केल्याने तन्वी नाराजही झाली होती. तिने भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखसमोरच रडत रडत आयुषला मारलं होतं. तेव्हा आयुषने तिला 'माझ्याकडून तुझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करु शकत नाही' असं स्पष्ट केलं होतं.
आज १०० दिवसांनी घराबाहेर आल्यानंतर तन्वीने लग्नाबाबत तिच्या प्लॅनिंगचा खुलासा केला. सध्या तन्वी बिग बॉस विजयाचं सेलिब्रेशन करत आहे. यापुढे तन्वी मालिका की सिनेमात कशात दिसणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.