आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:04 IST2026-04-24T16:02:00+5:302026-04-24T16:04:06+5:30

गेल्या दोन वर्षांत चीनच्या संरक्षण आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रकल्पाशी संबंधित तब्बल ८ दिग्गज शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

First 10 great scientists from America, now 8 from China, mysteriously killed; the world woke up! | आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!

आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असतानाच, दोन महासत्तांमध्ये पडद्यामागे एक अत्यंत भयानक आणि सायलेंट वॉर सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेपाठोपाठ आता चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत चीनच्या संरक्षण आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रकल्पाशी संबंधित तब्बल ८ दिग्गज शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने आपल्या १० अणुशास्त्रज्ञांच्या मृत्यूची चौकशी सुरू केल्याने संपूर्ण जगात खळबळ माजली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

'न्यूजवीक' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२३ ते २०२५ या कालावधीत चीनच्या हायपरसोनिक मिसाइल, ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत रसायनशास्त्र प्रकल्पांवर काम करणाऱ्या ८ अव्वल शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असून, इतरांचा मृत्यू अज्ञात आजार किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. या मृत्यूंच्या कारणांबाबत चीनने कमालीची गुप्तता पाळली असून, यामुळे यामागे परकीय गुप्तचर यंत्रणांचा हात तर नाही ना? असा संशय बळावला आहे.

चीनचे कोणते 'रत्ने' हरपले?

१. झांग जियाओक्सिन: स्पेस मॉनिटरिंग प्रोग्रामचे प्रमुख झांग यांचा २०२४ मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नक्की कसा झाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

२. फांग डेइंग: हायपरसोनिक प्रकल्पाचे आधारस्तंभ असलेले डेइंग २०२४ मध्ये आफ्रिका दौऱ्यावर असताना दगावले. ते तैवानच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जात होते.

३. ली मिनयोंग: बायोमेडिकल केमिस्ट्रीतील तज्ज्ञ मिनयोंग यांचा २०२५ मध्ये वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी अचानक मृत्यू झाला.

४. लियू डोनघाओ: ड्रोन तंत्रज्ञानातील तज्ज्ञ डोनघाओ यांचा २०२४ मध्ये एका अपघातात मृत्यू झाला.

५. झांग दाइबिंग: ड्रोन प्रकल्पाशी संबंधित असलेल्या दाइबिंग यांचा २०२३ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला.

६. यान होंग: हायपरसोनिक क्षेपणास्त्र निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे होंग २०२४ मध्ये एका अज्ञात आजाराचे बळी ठरले.

७. झोउ गुआनगुआन: प्रगत रसायन प्रकल्पावर काम करणारे गुआनगुआन यांचाही २०२३ मध्ये गूढ आजाराने मृत्यू झाला.

अमेरिकेतही अस्वस्थता!

चीनच्या आधी 'फॉक्स न्यूज'ने अमेरिकेबाबत असाच एक धक्कादायक खुलासा केला होता. गेल्या तीन वर्षांत अमेरिकेच्या परमाणु प्रकल्पाशी संबंधित १० शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. व्हाइट हाऊसने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोन्ही देश गप्प का?

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, इतके मोठे शास्त्रज्ञ दगावूनही चीन किंवा अमेरिका यापैकी कोणीही अधिकृतपणे भाष्य करायला तयार नाही. हे मृत्यू नैसर्गिक आहेत की यामागे एकमेकांच्या बुद्धिमत्तेचा नायनाट करण्याचा डाव आहे, यावर जागतिक संरक्षण तज्ज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. जर हे सायलेंट वॉर असेल, तर आगामी काळ जगासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

Web Title : अमेरिका, चीन के शीर्ष वैज्ञानिक रहस्यमय ढंग से मृत, वैश्विक चिंता बढ़ी।

Web Summary : अमेरिका और चीन के संवेदनशील परियोजनाओं से जुड़े वैज्ञानिकों की रहस्यमय मौतें महाशक्तियों के बीच एक मौन युद्ध की आशंका बढ़ाती हैं। वैश्विक अशांति के बीच जांच जारी है।

Web Title : Top scientists from US, China die mysteriously, raising global concerns.

Web Summary : Mysterious deaths of US and Chinese scientists linked to sensitive projects spark fears of a silent war between the superpowers. Investigations are underway amid global unease.