इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:24 IST2026-04-24T15:23:49+5:302026-04-24T15:24:50+5:30

Lebanon Air Strike: दक्षिण लेबनानमध्ये बुधवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 'अल-अखबार' या वृत्तपत्राच्या महिला पत्रकार अमल खलील या ठार झाल्या.

Lebanese Journalist Amal Khalil Killed in Israeli Strike Amid Hostilities; High-Level Peace Talks Convene in Washington | इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!

इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!

दक्षिण लेबनानमध्ये बुधवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 'अल-अखबार' या वृत्तपत्राच्या महिला पत्रकार अमल खलील या ठार झाल्या. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षाचे वृत्तांकन करत असताना एका घरात आश्रय घेतलेला असताना हा हल्ला झाला. अमल खलील आणि त्यांची सहकारी जैनब फराज कारने प्रवास करत असताना जवळच हल्ला झाला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळच्या एका घरात आश्रय घेतला. काही वेळातच इस्रायलने त्याच घराला लक्ष्य केले. या हल्ल्यात खलील यांच्यासह दोन नागरिकही मारले गेले.

या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या खलील यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बचावकर्त्यांनी केला, परंतु इस्रायली सैन्याकडून होणाऱ्या गोळीबारामुळे त्यांना मागे हटावे लागले. सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि लेबनानी सैन्य व रेड क्रॉसच्या मदतीने मध्यरात्री त्यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. त्यांची सहकारी जैनब फराज गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमल खलील या २००६ पासून द. लेबनॉनमधून धाडसी वृत्तांकन करत होत्या. या वर्षभरात लेबनॉनमध्ये ९ पत्रकारांना ठार मारण्यात आले आहे. 

वॉशिंग्टनमध्ये आज लेबनॉन-इस्रायल चर्चा

- लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात वॉशिंग्टनमध्ये गुरुवारी (अमेरिकेच्या वेळेनुसार)चर्चेची दुसरी फेरी होत आहे. इस्रायल आणि हिजबुल्लादरम्यान युद्धविराम वाढवणे आणि दीर्घकाळ शत्रुत्व असलेल्या या दोन शेजारी देशांमधील भविष्यातील वाटाघाटींचे नियोजन करणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.

- लेबनॉनचे अमेरिकेतील राजदूत नादा हामादेह मोवाड आणि अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत येचिएल लीटर यांच्यात ही बैठक होत आहे. गेल्या तीन दशकांत या दोन देशांमध्ये झालेली ही पहिलीच थेट चर्चा आहे.

- गेल्या शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम लागू झाला होता. त्याची मुदत वाढवण्यासंदर्भात चर्चा अपेक्षित आहे. तसेच इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर हल्ले करून तेथील घरे पाडण्यास सुरूवात केली आहे. हे मुद्दे या चर्चेत आहेत.

युद्धविरामाचे दोहोंकडून उल्लंघन

गेल्या आठवड्यात युद्धविराम लागू झाल्यापासून दोन्ही बाजूंनी त्याचे अनेकवेळा उल्लंघन केले आहे. या युद्धात लेबनॉनमध्ये सुमारे २,३०० नागरिकांचा मृत्यू झाला असून १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. १९९३ नंतर या दोन्ही देशांमध्ये झालेली ही पहिलीच थेट चर्चा असून, लेबनॉन सरकारला यातून कायमस्वरूपी शांततेची आशा आहे.

Web Title: Lebanese Journalist Amal Khalil Killed in Israeli Strike Amid Hostilities; High-Level Peace Talks Convene in Washington