lokmat Supervote 2024
Lokmat Money > Home Loan

आपलं स्वत:चं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. घर खरेदीसाठी होम लोन घेण्याचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण होम लोन हे दीर्घ काळ फेडावं लागतं. दीर्घ कालावधी असल्यानं यासाठी खुप विचार करून निर्णय घ्यावे लागतात. बँकेसह अनेक वित्तीय संस्थांसाठी ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमचा उत्तम क्रेडिट स्कोअर तुम्हाला अधिक आणि स्वस्त लोन मिळवून देण्यास मदतीचा ठरतो.

या कर्जावर बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून व्याजही आकारलं जातं आणि हे कर्ज ठराविक काळात दर महिन्याला विशिष्ठ रक्कमेचा हफ्ता भरून फेडता येतं. महत्त्वाची बाब म्हणजे जोपर्यंत तुम्ही कर्जाची रक्कम पूर्णपणे फेडत नाही, तोवर तुमचं घर बँकेकडे किंवा तुम्ही घेतलेल्या वित्तीय संस्थेकडे तारण राहतं. जर तुम्ही लोन घेताना आपल्या सोबत को अॅप्लिकंट जोडत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत बँक तुमच्या को अॅप्लिकंटच्याही उत्पन्नाचा कर्ज देताना विचार करते. एकत्र अर्ज केल्यानं तुमची पात्रता वाढते.

जॉईंट होम लोनमुळे दोन्ही अर्जदारांना टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. सोबतच महिला अर्जदार असेल तर काही बँका होम लोनच्या इंटरेस्ट रेटमध्येही फायदा देतात. जॉईंट होम लोनमुळे ईएमआयचा भारही एका व्यक्तीवरचा कमी होऊ शकतो. होम लोन घेण्यापूर्वी कोणती बँक किती दरावर तुम्हाला लोन देत आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येक बँकांचे व्याजदर निराळे असू शकतात. प्रत्येक बँका किंवा वित्तीय संस्था यांच्या व्याजदरात काही अधिक फरक असू शकतो. तसंच दीर्घ कालावधीच्या लोनमध्ये तुमचे पैसेही वाचू शकतात किंवा अधिकही भरावे लागू शकतात.

होम लोनशी संबंधित बँक दस्तऐवज वाचणे एक अवघड काम आहे कारण ते खूप अवजड आणि तांत्रिक अटींनी भरलेले आहे. तरीही, शक्य तितकं वाचून एखाद्याने ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्ही फायनॅन्शिअल कंटेन्ट किंवा लोनशी संबंधित माहिती देणाऱ्या साईट्सची मदत घेऊ शकता. कागदपत्रांमध्ये छोट्या अक्षरात लिहिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करा. ईएमआय पेमेंटशी संबंधित अटी व शर्थी नीट वाचणे आणि समजणे महत्वाचे आहे. 

कर्ज घेताना घराच्या किंमतीच्या काही प्रमाणात तुम्हाला डाऊनपेमेंटही करावं लागतं. तुम्ही जितकं डाऊन पेमेंट कराल तितका तुमच्यावरील बोजा कमी होऊ शकतो. काही बँका लोनचा कालावधी ३० वर्षांचा ठेवतात. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये ठरत असलेल्या रेपो दरावर कर्जाचे व्याजदर बँका कमी जास्त करत असतात.