LIC सह दोन विमा कंपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या मूडमध्ये सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:12 AM2024-04-20T10:12:13+5:302024-04-20T10:18:39+5:30

सरकार या कंपनीतील आपल्या शेअर्सच्या मूल्यावर आधारित १० टक्के हिस्सा हप्त्यांमध्ये विकण्यास तयार आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, केंद्र सरकार भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मधील हिस्सा विकण्याची शक्यता आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला ही माहिती दिली.

गुंतवणूकदारांच्या मागणीचं मूल्यांकन केल्यानंतर भारत सरकार जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि एलआयसीमधील काही स्टेक विकण्यास तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. जीआयसीसाठी गुंतवणूकदारांच्या रोड शोमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

अशा परिस्थितीत, सरकार आता आपल्या शेअर्सच्या मूल्यावर आधारित १० टक्के हिस्सा हप्त्यांमध्ये विकण्यास तयार आहे. जीआयसी मधील १० टक्के स्टेकची विक्री विशिष्ट कालावधीत केली जाईल. गेल्या सहा महिन्यांत जीआयसीच्या शेअर्समध्ये ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

एलआयसी बद्दल बोलायचं झाले तर सरकार २०२२ मध्ये लिस्टिंगनंतर ७ वर्षात १० टक्के आणि १० वर्षात २५ टक्के स्टेक विकण्याच्या लक्ष्यावर पुढे जात आहे. एलआयसीचे शेअर्स जोरदार कामगिरी करत असल्याचं सूत्रानं सांगितलं. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत ५८ टक्क्यांनी वाढले आहेत आणि शुक्रवारी कंपनीचे शेअर्स ९७३ रुपयांवर बंद झाले.

एलआयसीच्या आयपीओमध्ये, सरकारनं कंपनीतील ३.५ टक्के हिस्सा विकला होता आणि इंडेक्स फंडमध्ये विमा कंपनीचा समावेश करण्यासाठी आणखी १.५ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली होती. एलआयसीमधील १.५ स्टेक विकून सरकारला सुमारे ९२ अब्ज रुपये उभारण्यास मदत होऊ शकते.

दुसरीकडे एलआयसीला अदानी समूहातील गुंतवणूकीचाही मोठा फायदा झाला आहे. ३१ मार्च २०२४ रोजी एलआयसीचं अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचं मूल्य ३८,४७१ कोटी रुपये होतं, जे ३१ मार्च २०२४ रोजी ६१,२१० कोटी रुपयांवर पोहोचलं. अशा प्रकारे एलआयसीच्या गुंतवणुकीचं मूल्य एका वर्षात २२,३७८ कोटी रुपयांनी वाढलंय.

अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करूनही आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत, अदानी एंटरप्रायझेसमधील एलआयसीच्या गुंतवणुकीचं मूल्य ८,४९५.३१ कोटी रुपयांवरून १४,३०५.५३ कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. या कालावधीत एलआयसीची अदानी पोर्ट्समधील गुंतवणूक १२,४५०.०९ कोटी रुपयांवरुन २२,७७६.८९ कोटी रुपये झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अदानी ग्रीन एनर्जीमध्ये एलआयसीच्या गुंतवणूकीचं मूल्य दुप्पट होऊन ३,९३७.६२ कोटी रुपये झालं. एलआयसीच्या अदानी टोटल गॅस, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीमधील गुंतवणुकीचं मूल्यही वाढलंय.