मुकेश अंबानी वडिलांच्या चुकीतून शिकले अन् अशा प्रकारे मुलांमध्ये केली व्यवसायाची वाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:38 AM2024-04-19T11:38:41+5:302024-04-19T11:43:26+5:30

मुकेश अंबानी-अनिल अंबानी यांच्यातील संपत्तीचा वाद सर्वश्रुत आहे. पण, मुकेश यांनी हाच वाद वेळीच टाळला आहे.

Mukesh Ambani Birthday : दिग्गज भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आज 67 वा वाढदिवस आहे. या वयातदेखील ते तरुणांना लाजवतील, अशा पद्धतीने काम करतात. आपल्या व्यवसायाबाबत ते कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवत नाही. विशेष म्हणजे, व्यवसायातील बारकावे समजण्यासाठी फार पूर्वीच त्यांनी आपल्या तीन मुलांमध्ये व्यवसायाचे समान वाटप केले आहे. ईशा, आकाश आणि अनंत, यांच्यात व्यवसायाचे वाटप अजिबात सोपे नव्हते. पण, त्यांनी वेळीच हा निर्णय घेतला आणि इतिहासाची पुनरावृत्ती टाळली.

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी, यांच्यातील संपत्तीचा वाद सर्वश्रुत आहे. धीरुभाई अंबानी यांनी निधनापूर्वी मुलांमध्ये संपत्तीचे वाटप केले नव्हते. त्यामुळे, वडीलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमधील वाद खुप वाढला होता. तेव्हा त्यांची आई कोकिलाबेन यांना मध्यस्थी करावी लागली. आईच्या मध्यस्थीनंतर दोन्ही भावांनी रिलायन्स समुहातील कंपन्या वाटून घेतल्या. पण मुकेश अंबानी यांनी वडिलांच्या चुकीतून शिकले आणि वेळीच मुलांमध्ये संपत्तीचे समान वाटप केले. जाणून घ्या कोणता व्यवसाय कोणाकडे आहे?

आकाश अंबानी- आकाशने आपल्या करिअरची सुरुवात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम व्यवसायातून केली. तो जिओचा चीफ स्ट्रॅटेजिक म्हणून म्हणून काम पाहायचा. आज जिओ देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. तसेच, यूजर बेसच्या बाबतीत ती जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. व्यवसायाच्या वितरणाचा विचार केला तर दूरसंचार व्यवसाय पूर्णपणे आकाश अंबानीच्या हातात आहे. 2023 च्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स जिओचे मूल्य $58 अब्ज इतके आहे.

ईशा अंबानी- ईशा अंबानी न्यू जनरेशन बिझनेस लीडर म्हणून उदयास आली आहे. सध्या ती रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, रिलायन्स फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च आणि धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डाची सदस्य म्हणून काम करते. ईशा अंबानी मुख्यत्वे रिटेल व्यवसाय सांभाळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिटेलचे मूल्यांकन 100 अब्ज डॉलर्स इतके आहे.

अनंत अंबानी- गेल्या काही महिन्यांपासून अनंत त्याच्या प्री-वेडिंगमुळे खूप चर्चेत आला आहे. तो लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांनी अनंतला ऊर्जा आणि नवीन ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी दिली आहे. सध्या मुकेश अंबानी स्वतः या व्यवसायावर विशेष लक्ष देत आहेत. रिलायन्स नवीन उर्जेच्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करण्याचा धोरणात्मक विचार करत आहे. Jio Platforms Limited आणि Reliance New Energy Limited च्या बोर्डवर संचालक म्हणून अनंत ग्रीन एनर्जी क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय चालवत आहेत.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती-आपण मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो, तर ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर्स आहे. या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत $16.3 अब्जची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या वाढदिवसाशी तुलना केल्यास, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $81 अब्ज होती. याचा अर्थ मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका वर्षात 32 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी हे देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत, तर जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.