SIP करायची नाही? पोस्टात करा गुंतवणूक; महिन्याला ₹७००० गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील १२ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:33 AM2024-04-19T09:33:41+5:302024-04-19T09:40:43+5:30

Post Office Investment Scheme: जर तुम्हीही गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय शोधत असाल तर या योजनेचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता.

आजच्या काळात, एसआयपी (SIP) हे गुंतवणुकीचे एक चांगले साधन मानले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात एक असाही वर्ग आहे, जो बाजारातील गुंतवणुकीपासून लांब आहे. ते त्यांचे पैसे फक्त अशाच योजनांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात ज्यात त्यांना हमी परतावा मिळतो आणि गुंतवणूक सुरक्षित राहते.

तुम्ही देखील अशा गुंतवणूकदारांपैकी असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये (Post Office Recurring Deposit- RD) गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला एकरकमी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवूनही तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस आरडी ५ वर्षांसाठी आहे. यामध्ये ६.७ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे, ज्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा ७ हजार गुंतवल्यास, ५ वर्षात ५ लाख आणि १० वर्षात १२ लाख जोडू शकता.

जर तुम्ही या योजनेत दरमहा ७००० रुपये गुंतवले तर तुम्ही ५ वर्षात पोस्ट ऑफिस आरडीमध्ये एकूण ४,२०,००० रुपये गुंतवाल. यामध्ये तुम्हाला ६.७ टक्के दरानं व्याज दिलं जाईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला ५ वर्षात फक्त ७९,५६४ रुपये व्याज म्हणून मिळतील. तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याज जोडल्यास, तुमची मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम ४,९९,५६४ रुपये म्हणजेच सुमारे ५ लाख रुपये होईल.

जर तुम्हाला ही आरडी आणखी ५ वर्षांसाठी वाढवली तर तुम्ही सुमारे १२ लाख रुपये जोडू शकता. या प्रकरणात तुमची एकूण गुंतवणूक ८,४०,००० असेल. यावर तुम्हाला ६.७ टक्के दरानं ३,५५,९८२ रुपये व्याज म्हणून दिले जातील आणि मॅच्युरिटीवर ११,९५,९८२ रुपये म्हणजेच अंदाजे १२ लाख रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस आरडी १०० रुपयांनी उघडता येते, ही अशी रक्कम आहे जी कोणीही व्यक्ती सहज वाचवू शकते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडीवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत तुम्हाला ५ वर्षात व्याजाच्या स्वरूपात चांगला नफा मिळतो.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यामध्ये सिंगल व्यतिरिक्त जास्तीत जास्त ३ व्यक्तींसाठी संयुक्त खाते उघडता येतं. मुलांच्या नावानं खातं उघडण्याचीही सोय आहे. आरडी खात्याची मॅच्युरिटी ५ वर्षे आहे. परंतु, प्री-मॅच्युअर क्लोजर ३ वर्षांनी करता येतं. त्यात नॉमिनेशनचीही सुविधा आहे. त्याच वेळी, मॅच्युरिटीनंतर, आरडी खातं पुढील ५ वर्षे चालू ठेवता येते.