पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:52 IST2026-04-29T15:51:54+5:302026-04-29T15:52:17+5:30
Ethanol Blending India : भारत सरकारने E85 आणि E100 इंधनासाठी नवीन नियमांचा मसुदा जाहीर केला आहे. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होणार असून इंधन दरातही मोठी घट होणार आहे.

पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
वाढत्या पेट्रोलच्या किमती आणि परदेशातून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी भारत सरकारने आता एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत आता देशात E85 आणि E100 यांसारख्या उच्च इथेनॉल मिश्रित इंधनांना अधिकृत मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे E85 आणि E100 इंधन?
इथेनॉल हे ऊस, मका आणि खराब झालेल्या तांदळापासून तयार केलेले बायोफ्यूल आहे. E85 या इंधनात ८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोलचे मिश्रण असते. तर E100 हे पूर्णपणे शुद्ध बायोफ्यूल असून यात १००% इथेनॉलचा वापर केला जातो (०% पेट्रोल).
खिशाला मिळणार मोठा दिलासा
पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची निर्मिती स्वस्त पडते. अंदाजानुसार, १००% इथेनॉल इंधन (E100) प्रति लिटर ६० ते ७० रुपये दराने उपलब्ध होऊ शकते. यामुळे सर्वसामान्यांच्या इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी 'फ्लेक्स फ्युएल' इंजिन असलेल्या वाहनांचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर आहे.
आयात अवलंबित्व होणार कमी
भारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. आता पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या अनिश्चित पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारला इंधनाच्या बाबतीत 'आत्मनिर्भर' व्हायचे आहे. या नवीन नियमांमुळे भारताच्या जैवइंधन कार्यक्रमाला मोठी गती मिळणार आहे.