पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी विदर्भकर शुभम दुबेनं इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फिनिशरच्या भूमिकेत आपली खास छाप सोडली. यवतमाळमध्ये जन्मलेल्या या क्रिकेटरसाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या शुभमनं सुरुवातीला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी धडपड केली. अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर स्पोर्ट्स कोट्यातून संधी मिळवण्याच्या उद्देशानं त्याची पावलं क्रिकेटकडे वळली. मात्र त्यानंतर त्याच्या आयुष्यात जे घडलं, ते कल्पनेपलीकडचं होतं. IPL लिलावात एका रात्रीत 'करोडपती' ठरत तो अनकॅप्ड भारतीय खेळाडूंमध्ये चर्चेचा विषय बनला. चला तर मग जाणून घेऊयात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात फिनिशर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शुभम दुबेची प्रेरणादायी कहाणी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सरकारी नोकरीच्या आशेनं क्रिकेटर व्हायचं ठरवलं
२७ ऑगस्ट १९९४ रोजी विदर्भातील यवतमाळ येथे जन्मलेल्या शुभम दुबेचे वडील नागपूरच्या कमल चौकात पान टपरी चालवत होते, तर भाऊ खासगी कंपनीत नोकरी करत होता. २०२४ च्या IPL लिलावात ५.८ कोटींची बोली लागल्यानंतर शुभम पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. सुरुवातीच्या संघर्षमय काळात त्यानं सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यश मिळालं नाही. अखेर क्रिकेटर म्हणून नाव कमावत स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी मिळवता येईल, असं त्यानं आईला सांगितलं होतं. पण आज तो स्वतःची ओळख IPL स्टार म्हणून निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
एका रात्रीत 'करोडपती', अल्प संधीसह प्राइज टॅग घसरली
डावखुऱ्या हाताने फलंदाजीसह उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडल्यावर राजस्थान रॉयल्सकडून कोट्यवधीसह IPL मध्ये पदार्पणाची संधी मिळवल्यानंतर त्याची प्राइज टॅग कमी झाली. मागील दोन हंगामात तो ८० लाखांसह राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळतोय. पण किंमत कमी झाली असली तरी हिंमत कायम असल्याचे त्याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून दाखवून दिले.
कुटुंबियांसह मित्रांच्या मदतीनं टेनिस बॉल ते IPL असा प्रवास
शुभम दुबेच्या टेनिस क्रिकेटपटू ते IPL स्टार होण्याच्या प्रवासात कुटुंबिय आणि त्याच्या मित्र मंडळींचा महत्त्वाचा वाटा आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही कुटुंबियातील सदस्यांनी त्याच्यावर क्रिकेटचा नाद सोडून नोकरीचं बघ, असा दबाव कधीच टाकला नाही. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठीही पैसे नसायचे. याकाळात बरोबरीनं खेळणारे मित्र त्याच्या मदतीला धावले. निहाल आणि चितरंजन यांच्या संगतीत आल्यावर तो विदर्भ क्रिकेट असोसिएशनची जोडला गेला. स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तुंग फटकेबाजीनं त्याने क्रिकेटमधील आपली ओळख अधिक भक्कम केली. देशांतर्गत क्रिकेटमधील धमाकेदार शोमुळे RR नं त्याच्यासाठी IPL चं व्यासपीठ मिळालं.
धोनी, युवराज आणि गौतम गंभीरसह गांगुलीला मानतो आदर्श
शुभम दुबे हा धोनी, युवी आणि गंभीरसह क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीला आदर्श मानतो. धोनीसारखी फिनिशिंग करण्याची क्षमता, युवीप्रमाणे परिस्थितीनुसार खेळ दाखवण्याचा निश्चय, गंभीरचा अॅटिट्यूड आणि गांगुलीसारखी आक्रमक नेतृत्व या कॉम्बोसह त्याने स्वत:ला तयार केले आहे.