भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:57 IST2026-04-30T12:57:10+5:302026-04-30T12:57:57+5:30

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरलं आहे.

dhar there was no space yet workers were crammed eyewitness account of pickup accident more deaths so far | भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी

भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरलं आहे. चिकलिया फाट्याजवळ पिकअप आणि स्कॉर्पिओच्या धडकेत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारने मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली असून सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी इंदूरचे विभागीय आयुक्त आणि आयजींना तातडीने धारला पोहोचण्याचं आणि जखमींच्या वैद्यकीय व्यवस्थेवर स्वतः लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

भीषण अपघातात अनेक मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर ३० हून अधिक मजूर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान आणखी चार मजुरांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आता १६ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

वाहनांची जोरदार धडक

ही घटना तिरला पोलीस ठाणे हद्दीतील चिकलिया येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रात्री ८:३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप वाहनात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ४६ मजूर बसले होते. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. अचानक पिकअप अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या वेगवान स्कॉर्पिओने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा चक्काचूर झाला आणि त्यातील मजूर रस्त्यावर इतरत्र फेकले गेले. 

२५ हून अधिक लोक जखमी

अंधारात मजुरांचा आक्रोश ऐकून जवळचे लोक आणि पेट्रोल पंप कर्मचारी मदतीसाठी धावून आले. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर रात्री उशिरापर्यंत मृतांची संख्या १६ झाली. २५ हून अधिक लोक अजूनही जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती डॉक्टर छत्रपाल सिंह यांनी व्यक्त केली आहे.

"जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं”

पिकअपमध्ये असलेल्या अनिता नावाच्या मजूर महिलेने सांगितलं की, "गावात रोजगार नाही आणि मूलभूत सुविधाही नाहीत, त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्या गावात मजुरीसाठी जावं लागतं." त्या सकाळी कामासाठी घरातून निघाल्या होत्या आणि दिवसभर काम करून परतत असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी पिकअपचा वेग खूप जास्त होता आणि त्यात जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलेली होती.

१० हून अधिक मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप १० हून अधिक मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना इंदूरला पाठवण्यात आलं आहे. अचानक मोठ्या संख्येने रुग्ण आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय ताफा घटनास्थळी व रुग्णालयात पोहोचला. तिरला पोलीस ठाण्याने तपास सुरू केला आहे.
 

Web Title : भीषण दुर्घटना: धार जिले में 16 मजदूरों की मौत, 25 घायल

Web Summary : मध्य प्रदेश के धार में एक दर्दनाक हादसे में 16 लोगों की जान चली गई, 25 घायल हो गए। मजदूरों से भरी एक पिकअप ट्रक की स्कॉर्पियो से टक्कर हो गई। पिकअप में अधिक भीड़ होने से नुकसान और बढ़ गया। वित्तीय सहायता और मुफ्त इलाज की घोषणा की गई है।

Web Title : Horrific Accident: 16 Laborers Dead, 25 Injured in Dhar District

Web Summary : A tragic accident in Dhar, Madhya Pradesh, claimed 16 lives and injured 25. A pickup truck carrying laborers collided with a Scorpio. Overcrowding in the pickup worsened the devastation. Financial assistance and free medical treatment have been announced.