‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:11 IST2026-04-30T13:08:31+5:302026-04-30T13:11:29+5:30

Who was Shivaji Book: ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता? हे पुस्तक पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याची रंजक कहाणी समोर आली आहे.

Beyond Borders: Govind Pansare ‘Who was Shivaji?’ Gains Massive Popularity in Urdu and Reaches Pakistan | ‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात

‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात

संदीप आडनाईक

कोल्हापूर: ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. परंतु, या पुस्तकाच्या ‘शिवाजी कौन थे ?’ या उर्दू आवृत्तीच्या आतापर्यंत २५ हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर या पुस्तकाचा प्रवास आता सीमापार जाऊन पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याची रंजक कहाणी समोर आली आहे.

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या गेल्या ३७ वर्षांत २० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यात उर्दू भाषेसह २४ भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे. १९८८ मध्ये गोविंद पानसरे यांनी हे ७२ पानांचे पुस्तक लिहिले. 'लोकवाङ्मय', 'श्रमिक प्रतिष्ठान', 'समाजवादी प्रबोधिनी' आणि 'साऊ प्रकाशन' या चार संस्थांमार्फत याचे प्रकाशन केले गेले आहे.

सोलापूरातील विधिज्ञ आणि इतिहास अभ्यासक सय्यद शाह गाजीउद्दीन यांनी २००२ मध्ये ‘फुले-शाहू-आंबेडकर विचार मुस्लिम मंच’ची स्थापना केली. त्यानंतर ‘इदाराबराएमुतालिआ तहकीक व तारीख-ए-दखन’ या संशोधन संस्थेचीही उभारणी केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी २००६ मध्ये ‘शिवाजी कोण होता?’या पुस्तकाचे उर्दूत भाषांतर केले. ७४ पानांच्या या पुस्तकाची किंमत ५० रुपये आहे. त्याच काळात त्यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यावरही उर्दूत पुस्तके लिहिली. या सर्व ग्रंथांचे प्रकाशन स्वतः गोविंद पानसरे यांच्या हस्ते सोलापूरात झाले होते.

पाकिस्तानातून ई-मेल

२००९ मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतातील इस्लामकोट येथील घनश्यामदास नारवाणी यांनी गाजीउद्दीन यांना ई-मेल पाठवून त्यांच्या पुस्तकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. “दुर्गम भागात तुमची पुस्तके वाचायला मिळणे आनंददायी आहे,” असे त्यांनी नमूद केले होते. यानंतर पाकिस्तानमध्ये या साहित्याविषयी उत्सुकता वाढली. ‘सहमाही दलित अदब’चे संपादक गणपतराय भिल यांनीही या पुस्तकाच्या सिंधी भाषांतराची परवानगी मागितली आहे. गाजीउद्दीन यांचे ३१ जानेवारी २०१३ या दिवशी निधन झाले असले तरी देखील त्यांच्या पुस्तकांची लोकप्रियता कमी झालेली नाही. सामाजिक न्याय, समता आणि इतिहासाच्या नव्या मांडणीचा संदेश देणारे हे साहित्य आता सीमारेषा ओलांडून वाचकांपर्यंत पोहोचत आहे, हीच या प्रवासाची खरी ताकद आहे.- सर्फराज अहमद, इतिहास अभ्यासक, सोलापूर.

Web Title : 'शिवाजी कौन था?' उर्दू संस्करण की 25 हजार से अधिक प्रतियां बिकीं

Web Summary : गोविंद पानसरे की विवादास्पद पुस्तक 'शिवाजी कौन था?' उर्दू संस्करण के साथ सफल, 25 हजार से अधिक प्रतियां बिकीं। इसकी पहुंच सीमाओं से परे, पाकिस्तान तक भी है। 24 भाषाओं में अनुवादित, पुस्तक सामाजिक न्याय और समानता को बढ़ावा देती है, और पानसरे के निधन के बावजूद पाठकों के साथ प्रतिध्वनित होती रहती है।

Web Title : 'Shivaji Who Was It?' Urdu Edition Sells Over 25,000 Copies

Web Summary : Govind Pansare's controversial book, 'Shivaji Who Was It?', sees success with its Urdu edition, selling over 25,000 copies. Its reach extends beyond borders, even reaching Pakistan. Translated into 24 languages, the book promotes social justice and equality, continuing to resonate with readers globally despite Pansare's passing.