Riyan Parag Fined for Smoking RR vs PBKS IPL 2026: यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ दमदार कामगिरी करत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्सच्या संघाला राजस्थान रॉयल्सने पराभवाचा धक्का दिला. मात्र एकीकडे सातत्यपूर्ण खेळ करत असताना मैदानाबाहेरील घडामोडींमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ सातत्याने अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफमधील एका सदस्याने सामन्यादरम्यान मोबाईल वापरल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग इ-सिगारेट स्मोकिंगमुळे वादात सापडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पंजाब किंग्सविरुद्ध न्यू मुल्लापूर येथे झालेल्या लढतीदरम्यान रियान पराग हा स्मोकिंग करतानाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले. हा प्रकार राजस्थानच्या डावादरम्यान १६व्या षटकात घडला.कुणीतही हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या कृत्यामुळे रियान परागवर कारवाई होणार की नाही याची चर्चा सुरु झाली होती. अखेर आज त्याबाबत उत्तर मिळाले. आयपीएल शिस्तपालन समितीने रियान परागवर दंडाची कारवाई केली आहे. दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याला पंजाब किंग्सविरुद्ध ४०व्या सामन्यादरम्यान खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएलच्या आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या २५% दंड ठोठावण्यात आला आहे आणि एक डिमेरिट पॉइंट जमा करण्यात आला आहे.
रियानने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याचे आढळले. हे कलम खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. ही घटना दुसऱ्या डावादरम्यान घडली, जेव्हा रियान ड्रेसिंग रूममध्ये व्हेप वापरताना दिसला होता. रियानने आपला गुन्हा कबूल केला आणि सामनाधिकारी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली. आयपीएलची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी, दोषी संघ, त्याचे अधिकारी आणि खेळाडू/खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यासाठी बीसीसीआय इतर पर्यायांचाही शोध घेत आहे.
राजस्थान रॉयल्स आधीही अडकले होते वादात
याआधी राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंदर हे सामन्यादरम्यान, डगआऊटमध्ये मोबाईल वापरत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यांच्यासोबत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हासुद्धा डगआऊटमध्ये बसला होता. ही बाब आयपीएलमधील नियमांचे उल्लंघन होती. त्यामुळे भिंदर यांच्यावर दंडात्मक कारावाई करून त्यांना ताकिद देण्यात आली होती. मैदानाबाहेरील वादामुळे संघ अडचणीत सापडत असला तरी राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील आपली सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवली आहे. तसेच आठ सामन्यांमधून ६ विजय आणि १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.