खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:27 IST2026-04-30T14:27:07+5:302026-04-30T14:27:39+5:30
Onion in pocket Heat Wave: पिढ्यानपिढ्या असा समज चालत आला आहे की, जर तुम्ही उन्हात बाहेर पडताना खिशात कांदा ठेवला, तर तो बाहेरची उष्णता शोषून घेतो आणि तुमच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवतो. आता तर केंद्रीय मंत्र्यांनी देखील हे म्हटले आहे.

खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
सध्या देशात उष्णतेची लाट पसरली आहे. पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशा काळात उन्हाचा तडाखा किंवा 'उष्माघात' होऊ नये म्हणून अनेक घरगुती उपाय सुचवले जातात. यापैकीच एक सर्वात जुना आणि लोकप्रिय उपाय म्हणजे 'खिशात कांदा ठेवणे'. पण, खिशात कांदा बाळगल्याने खरोखरच उन्हापासून संरक्षण होतं का? की ही केवळ एक अंधश्रद्धा आहे? जाणून घ्या काय सांगतं विज्ञान.
पिढ्यानपिढ्या असा समज चालत आला आहे की, जर तुम्ही उन्हात बाहेर पडताना खिशात कांदा ठेवला, तर तो बाहेरची उष्णता शोषून घेतो आणि तुमच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवतो. ग्रामीण भागात आजही अनेक लोक उन्हात काम करताना हा उपाय करतात.
विज्ञानाचे मत काय?
आरोग्य तज्ज्ञ आणि विज्ञानाच्या मते, खिशात कांदा ठेवल्याने उन्हापासून संरक्षण मिळते, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. कांदा उष्णता शोषून घेतो हे विधान विज्ञानाला मान्य नाही. खिशात कांदा ठेवल्याने तुमच्या शरीराच्या अंतर्गत तापमानावर कोणताही परिणाम होत नाही.
कांदा खाण्याचे फायदे मात्र नक्की आहेत
जरी खिशात कांदा ठेवून उपयोग नसला, तरी उन्हाळ्यात कांदा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्यामध्ये 'क्वेर्सेटिन' नावाचे घटक असते, जे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने किंवा कांद्याचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
' उष्माघाता' पासून वाचण्यासाठी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, खिशात कांदा ठेवण्यापेक्षा भरपूर पाणी पिणे, लिंबू सरबत किंवा ताक घेणे, सुती कपडे घालणे आणि उन्हात जाताना डोके झाकणे हे उपाय अधिक प्रभावी ठरतात.