NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:20 IST2026-05-04T16:15:04+5:302026-05-04T16:20:41+5:30
चित्रपटातून सत्तेपर्यंतचा प्रवास; थलपती विजयही रिंगणात

South Stars Who Become CM: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा प्रभाव केवळ पडद्यापुरता मर्यादित नसून राजकारणातही त्यांनी मोठा ठसा उमटवला आहे. अनेक सुपरस्टार्सनी राजकारणात प्रवेश करून थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. सध्या थलापती विजय आपल्या TVK पक्षातून निवडणूक लढवत असून, मुख्यमंत्रिपदाचे मजबूत दावेदार मानले जात आहेत.

एम. जी. रामचंद्रन (MGR): तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते एम. जी. रामचंद्रन हे मुख्यमंत्री बनणारे पहिले अभिनेते होते. तीनवेळा त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली असून, ते सुमारे १० वर्षे सत्तेत होते. भारतरत्न, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर...अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते.

एम. करुणानिधी: एम. करुणानिधी यांनी कारकिर्दीची सुरुवात पटकथालेखक म्हणून केली. १९६९ ते २०११ दरम्यान सुमारे २० वर्षे, एकूण ५ वेळा मुख्यमंत्रिपदावर राहिले.

एन. टी. रामाराव (NTR): तेलुगू चित्रपटसृष्टीतील महानायक एन. टी. रामाराव यांनीही राजकारणात मोठी छाप पाडली. ते तीन वेगवेगळ्या कार्यकाळात मुख्यमंत्री (१९८३-८४, १९८४-८९, १९९४-९५) राहिले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारर्दीत सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले असून, पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

जे. जयललिता: जयललिता यांनी अभिनेत्री म्हणून मोठे यश तर मिळवलेच, शिवाय राजकारणातही आपली छाप सोडली. त्या तब्बल ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिल्या. त्यांचा एकूण कार्यकाळ १४ वर्षांचा होता.

जानकी रामचंद्रन: एम. जी. रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांनीही राजकारणात प्रवेश केला. १९८८ मध्ये काही आठवड्यांसाठी त्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी सुमारे २५ चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

इतर महत्त्वाचे चेहरे: चिरंजीवी यांनी केंद्रात मंत्रीपद भूषवले, तर त्यांचाच लहान भाऊ पवन कल्याण जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. वरील अभिनेत्यांशिवाय, कमल हसन, विजयकांत, सरतकुमार यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली, मात्र त्यांना आपले स्थान निर्माण करता आले नाही.
















