"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:11 IST2026-05-04T11:10:11+5:302026-05-04T11:11:39+5:30
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल निवडणूक निकालाच्या तिसऱ्या फेरीनंतर सुवेंदू अधिकारी ९०० मतांनी पिछाडीवर आहेत. मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना त्यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे.

"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही जागांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर ९०० मतांची आघाडी घेतली आहे. या सुरुवातीच्या पिछाडीनंतर सुवेंदू अधिकारी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले असून त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
जातीय समीकरणांवर सुवेंदू अधिकारींचे भाष्य
मतमोजणीच्या फेऱ्यांवर भाष्य करताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, "पहिल्या फेरीत मुस्लिम बहुल मतदार जास्त होते, त्यामुळे ममता बॅनर्जींना आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत हिंदू मतदारांचे प्राबल्य होते, तेव्हा मी २००० मतांनी पुढे आलो होतो. आता तिसऱ्या फेरीत त्या पुन्हा काही मतांनी पुढे आहेत."
"पुढचे काही राऊंड 'दीदी'साठी, पण शेवट माझाच"
अधिकारी यांनी विजयाचे गणित मांडताना सांगितले की, "पुढच्या साधारण ७ ते ८ फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर राहतील, हे मला आधीच माहित आहे. कारण ते भाग त्यांचे बालेकिल्ले आहेत. मात्र, त्या फेऱ्या संपल्यानंतर मी पुन्हा एकदा मुसंडी मारेन आणि अखेर मीच मोठ्या फरकाने विजय मिळवून दाखवेन."
राजकीय वर्तुळात चर्चा
मतमोजणी सुरू असतानाच सुवेंदू अधिकारी केंद्रातून बाहेर पडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांनी दिलेला हा दावा भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आहे की त्यांच्याकडे खरोखरच विजयाचे तगडे समीकरण आहे, हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.