पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:13 IST2026-05-04T12:12:13+5:302026-05-04T12:13:10+5:30
West Bengal Election Results 2026 Celebration : पश्चिम बंगाल निवडणूक निकालात भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली...
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सक्रिय झाले आहेत. सुरुवातीच्या कलानुसार भाजपने बंगालमध्ये १७५ हून अधिक जागांवर आघाडी घेत बहुमताचा टप्पा पार केला आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान आज संध्याकाळी ६:३० वाजता दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय मुख्यालयात पोहोचणार आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने अनपेक्षित मुसंडी मारत बहुमताचा आकडा (१४८) केव्हाच पार केला आहे. ताज्या कलानुसार, भाजप १७८ जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस १०६ जागांवर रेंगाळली आहे. भाजपचा सर्वात मजबूत गड मानल्या जाणाऱ्या उत्तर बंगालमध्ये ५४ पैकी ४० जागांवर भाजप पुढे आहे. अलीपूरद्वार आणि जलपाईगुडी जिल्ह्यात सर्व जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे, तर कूचबिहारमध्ये टीएमसीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागत आहे. अद्याप मतमोजणीच्या १६ फेऱ्या बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
दिग्गज नेत्यांची स्थिती:
ममता बॅनर्जी: भवानीपूर मतदारसंघातून ८००० मतांनी आघाडीवर.
अधीर रंजन चौधरी: काँग्रेसचे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत.
स्वप्ना बर्मन: जलपाईगुडीच्या राजगंजमधून टीएमसीच्या उमेदवार आणि ॲथलीट स्वप्ना बर्मन पिछाडीवर, भाजपचे हरधन सरकार पुढे.
सुजीत बोस: टीएमसीचे मंत्री विधाननगरमधून पिछाडीवर.
रत्ना देबनाथ: आरजी कर पीडितेची आई पानीहाटीमधून ३४०० मतांनी आघाडीवर.
वाराणसीत 'झालमुडी'चा जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान झाडग्राममध्ये 'झालमुडी' खाल्ली होती, त्याचा प्रभाव निकालात स्पष्ट दिसत आहे. झाडग्राममधील चारही जागांवर भाजप आघाडीवर आहे. याचा जल्लोष थेट मोदींच्या वाराणसी मतदारसंघात पाहायला मिळत असून, तिथे भाजप कार्यकर्ते एकमेकांना 'झालमुडी' वाटून आनंद साजरा करत आहेत.
या जागांवर भाजपचे वर्चस्व
कोलकातामधील रासबिहारी, एँटाली, माणिकतला, श्यामपुकूर तसेच नंदीग्राम, खडकपूर सदर आणि आसनसोल दक्षिण यांसारख्या महत्त्वाच्या जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर बीरभूम आणि दक्षिण २४ परगणा मधील काही जागांवर टीएमसीने आपली पकड टिकवून ठेवली आहे.