तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:51 IST2026-05-04T12:50:00+5:302026-05-04T12:51:41+5:30
Tamil Nadu Election Results 2026: तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या TVK पक्षाने १०० जागांचा टप्पा ओलांडला आहे. कोलाथूरमधून एम.के. स्टॅलिन पिछाडीवर असून काँग्रेस टीव्हीकेला पाठिंबा देण्याची शक्यता.

तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी ५० वर्षांची द्रविडी राजकारणाची परंपरा मोडीत काढण्याचे संकेत दिले आहेत. सुपरस्टार थलापती विजय याच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाने सुरुवातीच्या कलानुसार १०४ हून अधिक जागांवर आघाडी घेत सर्वांना चकित केले आहे. विशेष म्हणजे, कोलाथूर या आपल्या बालेकिल्ल्यातून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पिछाडीवर आहेत, जिथे टीव्हीकेचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
काँग्रेसचे टीव्हीकेला समर्थन?
राजकीय वर्तुळात सर्वात मोठी चर्चा ही काँग्रेसच्या भूमिकेची आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस 'इंडिया' आघाडीत डीएमकेसोबत होती. मात्र, टीव्हीकेची वाढती ताकद पाहून आणि राहुल गांधींनी स्टॅलिन यांच्यासोबत मंचावर न येण्याच्या निर्णयामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता टीव्हीके बहुमताच्या (११७ जागा) जवळ पोहोचत असताना, काँग्रेस टीव्हीकेला बाहेरून किंवा थेट पाठिंबा देऊन राज्यात नवीन सत्तासमीकरण तयार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थलापती विजय याने भाजपसोबत जाणार नसल्याचे वक्तव्य केले होते. आता तामिळनाडूमध्ये त्रिशंकू निकाल येत असून विजय काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्टॅलिन यांच्या डीएमकेला मोठा धक्का
तामिळनाडूमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक विक्रमी मतदान झाले होते. याचे रूपांतर प्रस्थापित विरोधी लाटेत झाल्याचे दिसत आहे. सध्याच्या कलानुसार,
TVK: १०४+ जागा (बहुमतासाठी ११७ आवश्यक)
AIADMK: ७२ जागा
DMK: ५८ जागा, यामध्ये काँग्रेसचे ५ जण आघाडीवर आहेत.
विजय यांच्या घरी 'शिट्टी' वाजवत जल्लोष
टीव्हीकेने शंभरी ओलांडताच अभिनेता विजय यांच्या चेन्नईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे. विजय यांच्या कुटुंबीयांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते शिट्ट्या वाजवून विजयाचा आनंद साजरा करत आहेत. जर टीव्हीकेने स्वबळावर ११७ चा आकडा गाठला, तर विजय हे तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.