केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:40 IST2026-05-04T13:33:34+5:302026-05-04T13:40:14+5:30

केरळमध्ये सर्वांचे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लागले आहे. या निकालातील कलांमध्ये काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट चित्र आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नीत वाम लोकशाही मोर्चाची अवस्था बिकट झाली आहे.

केरळ राज्यातील एकूण १४० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस नेतृत्वातील संयुक्त लोकशाही मोर्चा(UDF) १०१ आणि डावे पक्ष ३८ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर एका जागेवर पुढे आहेत.

या काँग्रेस आघाडीत इंडियन यूनियम मुस्लीम लीगचा समावेश होता. या निवडणुकीत मुस्लीम लीग UDF चा घटक पक्ष म्हणून मैदानात उतरली. त्यांनी राज्यात २७ जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले होते.

विशेष म्हणजे ज्या मुस्लीम लीगने राज्यात २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर ते आघाडीवर आहेत. यातील २१ उमेदवार मुस्लीम आहेत. मुस्लीम लीगने त्यांचा गड मानला जाणाऱ्या मलप्पुरम, कोझिकोड आणि कासरगोड जिल्ह्यात निवडणूक लढवली होती.

इंडियन यूनियन मुस्लीम लीग(IUML) सहसा मर्यादित जागांवर निवडणूक लढवते, पण तिचा विजयाचा दर खूप जास्त असतो. २०२१ च्या निवडणुकीत पक्षाने २५ जागांवर निवडणूक लढवली आणि १५ जागा जिंकल्या होत्या.

केरळमध्ये सध्या मतमोजणी सुरू आहे. त्यात विद्यमान सरकारमधील कमीत कमी १२ मंत्री आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन हेदेखील त्यांच्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. हा त्यांचा गड मानला जायचा, जिथे त्यांचे पिनराई गाव आहे.

मंत्री वीणा जॉर्ज, एमबी राजेश, ओआर केलू, आर बिंदू, जे चिंचुराणी, पी राजीव, केबी गणेश कुमार, व्हीएन वासवन, व्ही शिवनकुट्टी, व्ही अब्दुर रहमान, एके ससेदरन आणि रोशी ऑगस्टीन आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एलडीएफ, यूडीएफ आणि एनडीए या तीनही आघाड्यांसाठी निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत. राज्यातील १४० जागांवर एकूण ८८३ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

केरळ हे दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक आहे. याठिकाणी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात LDF तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील होती. परंतु काँग्रेसने UDF आघाडी बनवून सत्ताधारी एलडीएफला जोरदार टक्कर दिली. या निकालात काँग्रेसला यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे १० वर्षांनी केरळच्या राजकारणात काँग्रेस सत्तेत परतत आहे. सत्ताधारी वाममोर्चाबाबत लोकांच्या मनात रोष असल्याचं चित्र प्रचारात दिसत होते. जवळपास बरेच एक्झिट पोलने निकालाचे अंदाजही असेच वर्तवले होते. आता काँग्रेसने केरळमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
















