ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:35 IST2026-05-04T10:34:20+5:302026-05-04T10:35:04+5:30
West Bengal Election Result 2026 Live: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे लाईव्ह अपडेट्स. भाजप आणि टीएमसीमध्ये चुरशीची लढत.

ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
कोलकाता: पश्चिम बंगालमधील २९३ जागांसाठी आज होत असलेल्या मतमोजणीत सुरुवातीचे कल अत्यंत चुरशीचे दिसत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) १३८ जागांवर आघाडी घेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (TMC) जोरदार टक्कर दिली आहे. टीएमसी सध्या १२४ जागांवर आघाडीवर असून राज्याचा सत्तेचा सोपान कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
भवानीपूरमध्ये ममता 'दीदी' पुढे, पण 'दादा' पिछाडीवर
राज्यातील सर्वात हॉट सीट मानल्या जाणाऱ्या भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पिछाडीवर असून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. दुसऱ्याफेरीअखेर अधिकारी ६३८० आणि ममता यांना ४८२२ मते मिळाली आहे. दुसरीकडे, आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या आई रत्ना देबनाथ यांनी घेतलेली आघाडी या निवडणुकीतील भावनिक कल स्पष्ट करत आहे.
मोदींचा 'झालमुडी फॅक्टर' आणि बीरभूमचे चित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान ज्या भागात 'झालमुडी'चा आस्वाद घेतला होता, त्या झाडग्राम, बिनपूर, गोपीबल्लभपूर आणि नयाग्राम या चारही जागांवर भाजपने वर्चस्व राखले आहे. मात्र, बीरभूममध्ये टीएमसीचा दबदबा पाहायला मिळत असून, केवळ रामपुरहाटमध्ये भाजपचे धुर्वो साहा पुढे आहेत.
मोठा उलटफेर: राज्याचे कायदामंत्री मलय घटक पिछाडीवर
पश्चिम बर्धमानमधील अत्यंत महत्त्वाची आसनसोल नॉर्थ जागा चर्चेत आली आहे, कारण तिथे राज्य सरकारमधील कायदामंत्री मलय घटक पिछाडीवर पडले आहेत. पुरुलियामध्ये मात्र भाजपने ९ पैकी ८ जागांवर आघाडी घेत आपला गड मजबूत केला आहे.

"घाई नको, चित्र स्पष्ट होऊ द्या" – सुवेंदू अधिकारी
सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, "आत्ताच सरकार स्थापनेचा दावा करणे घाईचे ठरेल. किमान ५० टक्के मतमोजणी पूर्ण होईपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे."