पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:40 IST2026-05-04T11:39:50+5:302026-05-04T11:40:41+5:30
West Bengal Election Result 2026 Live: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स. भाजप ४५% मतांसह बहुमताच्या पार, तर तृणमूल काँग्रेस ११७ जागांवर पिछाडीवर.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
पश्चिम बंगालमधील २९३ जागांच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलानुसार भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्याच्या कलानुसार भाजप १६० जागांवर तर तृणमूल काँग्रेस ११७ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, २०२१ च्या तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली असून, तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत कमालीची घट झाली आहे.
भाजपची मतांची टक्केवारी वधारली
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३८.१% मते मिळाली होती, ती आता ४५% पर्यंत पोहोचताना दिसत आहेत. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचा मतांचा वाटा ४८.५९% वरून घसरून ४२% वर आला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, तृणमूलच्या बालेकिल्ल्यांना भगव्याने खिंडार पाडले आहे.
कुठे आघाडी, कुठे सन्नाटा?
भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे, तर भाजपचे सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान ज्या भागात 'झालमुडी' खाल्ली होती, त्या झाडग्राम, बिनपूर, गोपीबल्लभपूर आणि नयाग्राम या चारही जागांवर भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. निकाल विरोधात जात असल्याचे पाहून तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर सध्या सन्नाटा पसरला आहे.
एका जागेवर पुन्हा मतदान
राज्यातील २९३ जागांचे निकाल आज स्पष्ट होतील. मात्र, फाल्टा विधानसभा मतदारसंघात काही अनियमिततेमुळे निवडणूक आयोगाने मतदान रद्द केले आहे. तिथे २१ मे २०२६ रोजी पुनर्मतदान होईल आणि त्याचे निकाल २३ मे रोजी जाहीर होतील.