भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:24 IST2026-05-04T13:24:01+5:302026-05-04T13:24:41+5:30
उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात सोमवारी एक भीषण अपघात झाला आहे. कालपी कोतवाली क्षेत्रातील जोल्हूपूर वळणाजवळ झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात सोमवारी एक भीषण अपघात झाला आहे. कालपी कोतवाली क्षेत्रातील जोल्हूपूर वळणाजवळ झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण अयोध्येला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन घरी परतत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ललितपूर जिल्ह्यातील महरोनी येथील रहिवासी शशिकांत तिवारी आपल्या कुटुंबासह अयोध्येला गेले होते. सोमवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास परतत असताना कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला अचानक डुलकी लागली. याच दरम्यान कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती समोर चालणाऱ्या एका अज्ञात वाहनाला जाऊन धडकली.
४ जणांची प्रकृती चिंताजनक
ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील प्रवासी आतच अडकून पडले. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण १० लोक होते. यापैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जणांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतरचं दृश्य अत्यंत भयावह
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतरचं दृश्य अत्यंत भयावह होतं. कारच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं होतं. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना सुमारे एक तास अथक परिश्रम करावे लागले. केबिनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवण्यात आली.
मदतकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक विनय कुमार सिंह यांनी सांगितलं की, हा अपघात नॅशनल हायवे-27 वर झाला असून सर्व मृत ललितपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.