Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:27 IST2026-05-04T13:27:26+5:302026-05-04T13:27:55+5:30
Sunetra Pawar Break Ajit Pawar Record: महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या मताधिक्याचा विक्रम मोडला असून बारामती पोटनिवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे

Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
Baramati By Election Result 2026: बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मताधिक्याचा विक्रम केला आहे. १ लाख ६५ हजार २६६ मतांचा जादुई आकडा पार करून या १९ व्या फेरीअखेर त्यांनी तब्बल १ लाख ६८ हजार ५५५ मते मिळवली आहेत. बारामतीकरांनीसुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडून देत राष्ट्रीय पातळीवर नोंद केली आहे. या पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले आहे. दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार होत्या. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार होते.
बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा मानला जात होता. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जादुई आकडा पार करून विक्रमी मताधिक्य मिळवले आहे. आज मतमोजणीला सकाळपासून सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. एकूण २४ फेऱ्या पार पडल्या. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस मराठी’मधील अभिजित बिचुकले आणि इतर २० जणांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात असलेले २२ उमेदवारांनी मिळून आतापर्यंत ३ हजार ८३० एवढी मते मिळवली आहेत.