हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:51 IST2026-05-04T15:50:49+5:302026-05-04T15:51:27+5:30
Assam Assembly Election 2026 Result: काँग्रेसचे आसाममधील प्रमुख नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय गौरव गोगोई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. गौरव गोगोई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजारांहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. भाजपानेआसाममधील विधानसभेच्या १२६ जागांपैकी १०० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेससोबतच काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये काँग्रेसचे आसाममधील प्रमुख नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय गौरव गोगोई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. गौरव गोगोई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजारांहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.
आसाममधील विधानसभा निवडणुकीदरम्यान, राज्या काँग्रेसचं नेतृत्व करत असलेल्या गौरव गोगई यांनी भाजपाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना जोरदार आव्हान दिले होते. दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वाकयुद्धही रंगले होते. दरम्यान, सत्ता आल्यास काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या गौरव गोगोई यांनी जोरहाट विधानसबा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिथे गौरव गोगोईंसमोर भाजपाचे हितेंद्रनाथ गोस्वामी यांचे आव्हान होते.
दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये गौरव गोगोई हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. अखेरीस हितेंद्रनाथ गोस्वामी यांनी गौरव गोगोई यांचा तब्बल २३ हजार १८२ मतांनी पराभव केला गौरव गौगोई यांचा झालेला पराभव हा आसाममध्ये काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.