भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:30 IST2026-05-04T16:28:12+5:302026-05-04T16:30:15+5:30
West Bengal Election Result BJP Win: भाजप १९४ जागांवर आघाडीवर असून ४ जागा जिंकल्या आहेत. मोंटेश्वरमध्ये भाजपचा पहिला विजय. ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी काउंटिंग सेंटरवर.

भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, बहुमताचा आकडा पार करत विजयाची पहिली अधिकृत मोहोर उमटवली आहे. ताज्या कलानुसार, भाजप १९४ जागांवर तर तृणमूल काँग्रेस ८७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने आतापर्यंत ४ जागा जिंकल्या असून तृणमूलला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. यातच वातावरण तणावाचे असताना ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी हे दोघेही सध्या भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर समोरासमोर आले आहेत.
बंगालमधील विजयाचे खाते उघडताना मोंटेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सैकत पांजा यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा १४,७९८ मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारींची मोठी आघाडी
नंदीग्राम या अतिशय संवेदनशील जागेवर १० व्या फेरीअखेर भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी १४,६३१ मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे, भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा सुमारे ७ हजार मतांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी हे दोघेही सध्या भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर समोरासमोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | TMC chairperson and West Bengal CM Mamata Banerjee arrives at Sakhawat Memorial counting hall in Kolkata as counting of votes is underway.
— ANI (@ANI) May 4, 2026
BJP is currently leading on 194 seats, way past the majority mark. pic.twitter.com/3U52YjrO42
भाजप कार्यालयात उत्सवी वातावरण
कोलकात्याच्या सॉल्ट लेकस्थित भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. सुनील बन्सल, बिप्लव कुमार देव, मंगल पांडे, अमित मालवीय आणि निशिकांत दुबे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते गुलालाची उधळण करत 'जय श्री राम'च्या घोषणा देत आहेत.
निवडणुकीची सद्यस्थिती:
भाजप: १९४ (आघाडीवर), ४ (विजयी)
टीएमसी: ८७ (आघाडीवर), १ (विजयी)
फालता जागा: २१ मे रोजी पुनर्मतदान होणार.