Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:37 IST2026-05-04T17:36:12+5:302026-05-04T17:37:35+5:30
Kangana Ranaut And Rahul Gandhi : कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत अफवा पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यात ती कधीच मागे हटत नाही. अलीकडेच एका 'मीम पेज'ने तिच्या नावाने राहुल गांधींबाबत एक आक्षेपार्ह आणि फेक पोस्ट शेअर केली. कंगनाने केवळ या बातमीचं खंडनच केलं नाही, तर राजकारणातील महिलांच्या सन्मानाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा खालच्या पातळीवरील कृत्यांकडे आपण दुर्लक्ष करणार नाही, असं तिने स्पष्ट केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर राघव चड्ढा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, एका मीम पेजने कंगना राणौतची एक फेक कमेंट शेअर केली. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, कंगना म्हणाली आहे, "जर राहुल गांधी भाजपामध्ये आले, तर मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे." ही पोस्ट समोर येताच कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ती शेअर करत अफवा पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

कंगनाने लिहिलं की, "ही फेक बातमी अत्यंत घृणास्पद आहे आणि राजकारणातही स्त्रियांना कोणताच सन्मान नाही." अशा प्रकारचं खोटं पसरवणाऱ्यांना टोला लगावताना ती म्हणाली की, त्यांना आपल्या वागण्याची लाज वाटली पाहिजे.
'क्वीन'च्या सीक्वलची तयारी
राजकीय कारकिर्दीसोबतच कंगना अभिनयाच्या क्षेत्रातही एक्टिव्ह आहे. सध्या ती तिच्या 'क्वीन' या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलवर काम करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांनी यासाठी तीन महिन्यांचं टाईट शेड्यूल तयार केलं आहे.
चित्रपटाच्या नावाबाबत सस्पेन्स
या चित्रपटाच्या नावाबाबतही बरीच चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते या चित्रपटाचं नाव 'क्वीन २' ठेवण्यास उत्सुक नाहीत. त्याऐवजी चित्रपटाचं नाव 'क्वीन फॉरेव्हर' असं ठेवलं जाऊ शकतं. चित्रपटाच्या संकल्पनेनुसार हे नाव अधिक योग्य आणि प्रभावी असल्याचं निर्मात्यांना वाटतं. मात्र अद्याप चित्रपटाच्या अधिकृत नावाची घोषणा झालेली नाही.