पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:20 IST2026-05-04T17:17:10+5:302026-05-04T17:20:41+5:30
Congress Assembly Election Results 2026: चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशाचे निकाल जाहीर झाले. धक्कादायक निकाल लागलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला किती यश मिळालं आहे?

पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Assembly Election Result 2026 Congress: भाजपाने आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकले. पुद्दुचेरीत सत्तांधारी आघाडीत भाजपा आहे. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला या विधानसभा निवडणुकांमध्ये किती यश मिळाले? तर केरळची सत्ता मिळवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्यावेळी एकही जागा न जिंकलेली काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे.
केरळात मिळाली सत्ता
केरळात काँग्रेस आघाडी विरुद्ध डावी आघाडी अशीच लढत होती. तिथे काँग्रेसने चांगली कामगिरी करत डाव्या लोकशाही आघाडीला सत्तेतून खाली खेचले आहे. साडेपाचपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, काँग्रेसने केरळमध्ये ५५ जागा जिंकल्या, तर ८ जागांवर आघाडीवर आहे.
आसाममध्ये काँग्रेसची निराशा
आसाममध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्याची आशा होती. पण, भाजपाने विजयाची हॅट ट्रिक केली. मोठे यश अपेक्षित असलेल्या काँग्रेसला आसाममध्ये २० जागा मिळण्याचीच शक्यता आहे. कारण २० जागांवरच त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
दुसरीकडे तामिळनाडूमध्ये काँग्रेसची कामगिरी इतकी चांगली राहिली नाही. काँग्रेसने एक जागा जिंकली असून, चार जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या झंझावातात मागच्या वेळी शून्यावर आलेल्या काँग्रेसच्या पदरात दोन जागा पडण्याची अंदाज आहे. तिथे दोन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.